Home महाराष्ट्र पोस्ट नागपूर पोस्ट दीक्षाभूमी स्मारक समितीच्या कार्यालयाचे कुलूप तोडले

दीक्षाभूमी स्मारक समितीच्या कार्यालयाचे कुलूप तोडले

नागपूर : ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या कार्यालयाचे गेल्या दोन वर्षांपासून कुलूप बंद होते. अखेर हे कुलूप सोमवारी दुपारी ४.३० वाजता तोडण्यात आले. या घटनेमुळे स्मारक समितीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

धम्मचक्र प्रवर्तन दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी या दिवशी देश-विदेशातून लाखो अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर दाखल होतात. मात्र, तयारीसंदर्भात कोणतीही हालचाल होत नसल्याने स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि अनुयायांमध्ये संताप वाढत आहे. स्मारक समितीचे कार्यालय बंद असल्यामुळे आयोजनाच्या बैठका घेणे, आवश्यक नियोजन करणे आणि सुविधांबाबत निर्णय घेणे शक्य होत नव्हते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीबाबत वाद तीव्र

मिळालेल्या माहितीनुसार, स्मारक समितीत गेल्या दोन वर्षांपासून दोन गटांमध्ये तीव्र मतभेद सुरू आहेत. एकीकडे समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांचा गट असून दुसरीकडे अध्यक्ष भन्ते सुरेई ससाई यांचा गट आहे. या वादामुळे स्मारक समितीचे कार्यालय दीर्घकाळ बंद राहिले. परिणामी दीक्षाभूमीवरील कामकाज ठप्प झाले होते. डॉ. राजेंद्र गवई यांच्या गटाने काही दिवसांपूर्वी एक स्वतंत्र बैठक घेऊन ही परिस्थिती तातडीने बदलावी अशी मागणी केली होती. बैठकीत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीसाठी समितीची औपचारिक बैठक घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर स्मारक समितीचे कार्यालय बंद ठेवणे ही अनुयायांच्या भावनांशी गल्लत करणारी बाब असल्याचेही गवई गटाने स्पष्ट केले. यामुळे त्यांनी कार्यालयाचे कुलूप त्वरित तोडून ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अखेर सोमवारी हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यात आला.

स्मारक समितीचे समन्वय महत्वाचे

कुलूप तोडल्यानंतर कार्यालय पुन्हा सुरू झाले असले तरी दोन्ही गटांतील वाद मिटण्याची चिन्हे अद्यापही दिसत नाहीत. यामुळे यावर्षीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आयोजनावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, वैद्यकीय सेवा आदी अनेक बाबींसाठी स्मारक समितीचे समन्वय महत्त्वाचा असतो. परंतु अंतर्गत संघर्षामुळे हे नियोजन वेळेत होईल का, याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. दरम्यान, स्मारक समितीतील वाद मिटवण्यासाठी शहरातील काही मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणीही पुढे येत आहे. दीक्षाभूमी हे बौद्ध अनुयायांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थळ आहे. त्यामुळे समितीतील कलह बाजूला ठेवून एकत्रितपणे तयारी केली जाणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.