व्हॉट्सअॅपच्या या फीचरची तुलना फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवरील यूजरनेम सुविधेशी केली जात आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आधीपासूनच ही सुविधा उपलब्ध असून, आता व्हॉट्सअॅपही त्याच दिशेने पाऊल टाकत आहे.
यूजरनेमसाठी असतील काही नियम :
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप यूजरनेम तयार करताना काही नियम लागू करणार आहे. यूजरनेममध्ये किमान तीन अक्षरे असणे आवश्यक असेल. तसेच प्रत्येक यूजरनेम वेगळे असेल आणि एकाच नावाचा वापर दोन व्यक्तींना करता येणार नाही.याशिवाय प्रसिद्ध व्यक्ती, सरकारी संस्था, सार्वजनिक संघटना आणि मोठ्या ब्रँड्सच्या नावांशी संबंधित काही यूजरनेम आरक्षित ठेवले जाणार आहेत, जेणेकरून बनावट खाते तयार करून फसवणूक करण्याच्या घटनांवर आळा घालता येईल.व्हॉट्सअॅपच्या या निर्णयामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण अधिक मजबूत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः व्यावसायिक, पत्रकार, कंटेंट क्रिएटर्स आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आपला मोबाईल नंबर सार्वजनिक न करता इतरांशी संवाद साधणे अधिक सोपे होणार आहे.याशिवाय ऑनलाइन व्यवसाय करणारे, ग्राहकांशी संवाद साधणाऱ्या कंपन्या आणि विविध सेवा पुरवणाऱ्या संस्थांनाही या फीचरचा मोठा फायदा होऊ शकतो.व्हॉट्सअॅपने या फीचरची चाचणी सुरू केली असून, काही वापरकर्त्यांना यासंदर्भातील नोटिफिकेशनही पाठविण्यात आले आहे. कंपनीकडून हे फीचर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून, येत्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांत ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.एकूणच, ‘यूजरनेम’ फीचरमुळे व्हॉट्सअॅपवर संवाद साधण्याची पद्धत बदलणार असून, वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित, गोपनीय आणि आधुनिक अनुभव मिळणार आहे.










