नागपूर : नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार अधूनमधून समोर येतात. मात्र, थेट मुंबईच्या मंत्रालयातच बनावट आयकार्डच्या आधारे प्रवेश मिळवत तरुणांना फसवल्याचा अनोखा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंत्रालयात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्यासाठी सात आरोपींनी बनावट मुलाखती आयोजित करून तब्बल ९ लाख ५५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी एका आरोपीला अटक झाली असून सहा जण फरार आहेत. पीडित राहुल तायडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व दोषींना तात्काळ अटक करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
आरोपींची नावे जाहीर
या प्रकरणात अटक झालेला आरोपी लॉरेन्स हेनरी (४५, रा. अष्टविनायक लॉनजवळ, म्हाळगीनगर) असून, फरार आरोपींमध्ये शिल्पा उदापुरे (४०, रा. अष्टविनायक लॉनजवळ, म्हाळगीनगर), वसंतकुमार ऊर्फ वसंतराव उदापुरे (६०, रा. पंचतारा हाऊसिंग सोसायटी, नरेंद्रनगर), विजय पाटनकर (४०), नितीन साठे (४१), सचिन डोळस (४५) आणि बाबर (५५, शिपाई) यांचा समावेश आहे.
नोकरीचे आमिष आणि बनावट प्रक्रिया
राहुल तायडे (रा. सुगतनगर, नारी रोड, जरीपटका) हे नोकरीच्या शोधात असताना आरोपी हेनरी त्यांच्या संपर्कात आला. त्याने मंत्रालयात कनिष्ठ लिपिकाची नोकरी मिळवून देतो, अशी बतावणी करून वेळोवेळी पैसे घेतले. एकूण ९ लाख ५५ हजार रुपये घेतल्यानंतरही नोकरी मिळाली नाही. एवढेच नव्हे, तर आरोपींनी तायडे यांची मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना अधिक विश्वासात घेतले. यानंतर तायडे यांना मंत्रालयात नेऊन शिल्पा उदापुरे यांच्या नावाची पाटी लावलेल्या कॅबिनमध्ये बनावट मुलाखत घेण्यात आली. या सर्व प्रक्रियेच्या दरम्यान तायडे यांना बनावट आयकार्ड देण्यात आले, ज्याच्या आधारे त्यांना मंत्रालयात सहज प्रवेश मिळत होता.
तक्रारीनंतर अटक
२०१९ मध्ये पैसे दिल्यानंतरही जॉइनिंग लेटर न मिळाल्यामुळे तायडे यांनी सातत्याने तगादा लावला. मात्र नोकरी न मिळाल्याने त्यांनी अखेर हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासानंतर आरोपी हेनरीला मागील आठवड्यात मुंबईतून अटक करण्यात आली. सहा आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पीडित तायडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आरोपींनी मंत्रालयासारख्या संवेदनशील ठिकाणी बनावट आयकार्ड तयार करून फसवणूक केली. दोषींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा व्हावी,” अशी मागणी केली.
या प्रकारामुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बनावट आयकार्ड कसे तयार झाले आणि मंत्रालयात प्रवेश कसा मिळाला, याचा तपास सुरू असून, ही घटना नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.










