Home पॉलिटिकल पोस्ट 46 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! थकीत वीजबिलाची संपूर्ण थकबाकी माफ; मोफत वीज...

46 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! थकीत वीजबिलाची संपूर्ण थकबाकी माफ; मोफत वीज योजना कायम, नवीन वीजजोडणीचाही मार्ग मोकळा

 मुंबई :  राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. साडेसात हॉर्सपॉवर (7.5 HP) पर्यंत कृषी पंपवापरणाऱ्या शेतकऱ्यांची थकीत वीजबिलाची रक्कम माफ करण्यात येणार असून, राज्यातील तब्बल ४६ लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणारआहे.  यासोबतच शेतकऱ्यांना मिळत असलेली मोफत कृषी वीज योजना यापुढेही कायम ठेवण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्याबाबतची अनिश्चितताही दूर होणार आहे. भाजप किसान मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध कृषी धोरणांवर भाष्य करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. गेल्या काही वर्षांत कृषी वीजबिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली होती. अनेक शेतकरी थकीत बिलामुळे अडचणीत सापडले होते. त्यांना नवीन वीजजोडणी मिळण्यातही अडथळे निर्माण होत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने थकीत वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी थकीत वीजबिलामुळे अनेक शेतकऱ्यांना नवीन कृषी वीज कनेक्शन मिळत नव्हते.  आता ही अडचण दूर करण्यात आली असूघेताना न, नवीन वीजजोडणी जुन्या थकबाकीचा अडसर राहणार नाही.  त्यामुळे सिंचनासाठी नवीन वीजजोडणी घेऊ इच्छिणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कृषी क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी वीज, सिंचन आणि पायाभूत सुविधांवर सातत्याने भर दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत व्हावी आणि शेती अधिक फायदेशीर व्हावी, हा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

मासून ब्रेक’बाबतही मुख्यमंत्र्यांचे आवाहन :

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाच्या परिस्थितीबाबतही महत्त्वाचे वक्तव्य केले. काही भागांमध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असली, तरी 22 जुलैपर्यंत पेरण्या थांबवण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला असून, काही ठिकाणी पावसाचा तुटवडा असला तरी परिस्थितीवर सरकार सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता कृषी विभाग आणि हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांनुसार निर्णय घ्यावेत, असे आवाहनही मुख्यमंत्री यांनी केले.