Home City post नागपूर जिल्ह्यात शिक्षकांचे सामूहिक आंदोलन; १५०० शाळा राहिल्या बंद

नागपूर जिल्ह्यात शिक्षकांचे सामूहिक आंदोलन; १५०० शाळा राहिल्या बंद

नागपूर :  टीईटीडी सर्वेची सक्ती आणि ‘एसआर’ मोहिमेतील अशैक्षणिक कामाच्या जाचाविरोधात नागपूर जिल्ह्यातील १५०० हून अधिक शाळा बंद ठेवून हजारो शिक्षक गुरुवारी रस्त्यावर उतरले. कुठे एक, तर कुठे दोन ते तीन शिक्षकांच्या भरवशावर कामकाज चालविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना पूर्णपणे कुलूप ठोकत शिक्षकांनी सामूहिक रजेचे हत्यार उपसले आणि नागपूरच्या संविधान चौकात शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत एल्गार पुकारला. नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना आणि समविचारी संघटनांच्या आवाहनानुसार हजारो शिक्षकांनी गुरुवारी संविधान चौकात आंदोलन केले. एकत्र येत शाळाबंदीची जोरदार घोषणाबाजी केली. टीईटीडी सर्वेची सक्ती आणि ‘एसआर’ मोहिमेतील अशैक्षणिक कामाच्या जाचाविरोधात हा एल्गार पुकारण्यात आला.त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ९५ टक्के शाळेतील शिक्षक आंदोलनात सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांना सुटी मिळाली. जिल्हा परिषदेच्या १५१२ शाळा असून, शिक्षकांची संख्या ३५०० च्या जवळपास आहे. जि. प. शाळेच्या सर्व संघटनांच्या समन्वयातून हे आंदोलन करण्यात आले. त्याचदरम्यान खासगी अनुदानित शाळेतील १७ टक्के शिक्षक आंदोलनात सहभागी झाले.

शाळांमधील वास्तव :
नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १५०० पेक्षा जास्त शाळांमध्ये सध्या मुख्याध्यापकांची पदेच रिक्त आहेत. अनेक शाळांमध्ये केवळ एक, दोन किंवा तीन शिक्षक संपूर्ण शाळेचा भार सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढल्याने आणि सेवाशर्तीतील नव्या नियमांमुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा ताण आणि टीईटीडी सर्वेच्या सक्तीमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे या निर्णयांचा पुनर्विचार करून शिक्षकांच्या प्रमुख मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.