Home City post NEET पेपरफुटीवरून दिल्ली पेटली! विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विरोधकांची साथ; राहुल-प्रियंका ताब्यात, अडीच तासांनी...

NEET पेपरफुटीवरून दिल्ली पेटली! विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विरोधकांची साथ; राहुल-प्रियंका ताब्यात, अडीच तासांनी सुटका

नवी दिल्ली निट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला खेळ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. महिला विद्यार्थिनींनाही मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला असून, काही विद्यार्थिनींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.  या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. आंदोलनादरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह पक्षाचे अनेक खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमारे अडीच तासांनंतर सर्वांची सुटका करण्यात आली. काँग्रेसच्या आंदोलनामुळे पंतप्रधान निवास परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारले होते. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राहुल गांधी यांना पोलिसांनी उचलून वाहनात बसवल्याचे, तर प्रियंका गांधी यांना महिला पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतल्याचे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

पेपरफुटी हे घोर पाप  – पंतप्रधान मोदी :

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते अभिजित दिपके यांची भेट घेत आंदोलनाची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध करत आंदोलकांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी सरकारकडून आंदोलन मागे घेण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न झाल्याचीही चर्चा होती. काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची अट ठेवण्यात आल्याचे वृत्त समोर आले. मात्र, या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवत काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधला. विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारने उत्तर द्यावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी केली. दुसरीकडे, केंद्र सरकारने नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई सुरू असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच पेपरफुटी हे घोर पाप असून दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.