नरखेड (प्रतिनिधी) – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला असला तरी अनेकांना जिल्हा परिषदेची आस लागली आहे. अशात अनेक इच्छुकांनी आपले दंड थोपटले आहे. कुठे आघाडी, कुठे युती तर अपक्ष उमेदवारांमध्ये घमासान होणार आहे. मात्र अनेक सर्कलमध्ये अपक्ष उमेदवार देखील घाम फोडणार आहे.
नरखेड तालुक्यात बेलोना, सावरगाव, जलालखेडा आणि भिष्णूर असे चार जिल्हा परिषदेचे सर्कल आहेत. यामधील भिष्णूर सर्कलमध्ये अनेक इच्छूकांनी दावेदारी ठोकली आहे. भिष्णूर सर्कल सर्वसाधारण गटासाठी राखीव असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळू जोध सदस्य आहेत. अनिल देशमुखांचे वर्चस्व असलेल्या या सर्कलमध्ये माजी पंचायत समिती सभापती सतीष रेवतकर यांनी खिंडार पाडले. यंदा भाजपाकडून सतिष रेवतकर यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर नितीन धोटे, प्रफुल्ल जोशी, सुरेश बारई आणि दिनेश टुले हे देखील भाजपाकडून लढण्यास इच्छूक आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून प्रवीण ऊर्फ बाळू जोध यांचे नाव चर्चेत आहे. विशेष म्हणजे ऐन वेळेवर सलील देशमुख देखील रिंगणार येऊ शकतात. याशिवाय दोघांनाही टक्कर देण्यासाठी अपक्ष उमेदवार गौरव वसंतराव वंजारी यांनी देखील जोरदार तयारी केली आहे.
संभाव्य अपक्ष उमेदवार गौरव वसंतराव वंजारी तरूण असून भिष्णूर येथील आहेत. तेली समाजातून ते येत असून या सर्कलमध्ये तेली आणि कुणबी मतांचा प्रभाव आहे. शिवाय भिष्णूर, तिनखेडा आणि भारसिंगी या गावांमध्ये वंजारी यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे गौरव वंजारी यांच्या उमेदवारीने प्रस्थापितांना धक्का बसू शकतो. भिष्णूर सर्कलमध्ये तिनखेडा, भिष्णूर, लोहारीसावंगा, भारसिंगी, नारसिंगी ही मोठी गावे आहेत. भाजपाकडून अनेक दावेदार असले तरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार चरणसिंह ठाकूर यांच्याशी सतिष रेवतकर यांची जवळीक असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
नरखेड तालुक्यातील भिष्णूर सर्कलमध्ये राजकिय वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून स्पर्धा निर्माण झाली आहे. मात्र मतदारांनी कोणता उमेदवार निश्चित केला आहे, हे आता वेळचं ठरवेल…










