Home हेल्थ पोस्ट शरीर कमवायला गेले, दुखणी घेऊन परतले! चुकीच्या व्यायामामुळे २०टक्के तरुण रुग्णालयात

शरीर कमवायला गेले, दुखणी घेऊन परतले! चुकीच्या व्यायामामुळे २०टक्के तरुण रुग्णालयात

नागपूर : सुटसुटीत शरीरयष्टी, पिळदार स्नायू आणि आकर्षक बॉडी कमावण्याच्या ध्यासापोटी जिमची वाट धरणार्‍या तरुणाईच्या बाबतीत एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. योग्य मार्गदर्शनाचा अभाव, क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे आणि चुकीच्या व्यायाम पद्धतींमुळे अनेक तरुण गंभीर दुखापतींचे शिकार ठरत आहेत. शरीर सुदृढ करण्याच्या नादात तरूण स्वतःच्याच हाताने शरीराला दुखापतींच्या गर्तेत लोटत असून “शरीर कमवायला गेले आणि दुखणी घेऊन परतले,” अशी गंभीर परिस्थिती ओढवली आहे.

नागपूर येथील सक्करदरा परिसरातील प्रसिद्ध ‘चौधरी रुग्णालया’च्या निरीक्षणातून ही माहिती उघडकीस आली आहे. रुग्णालयात अस्थिरोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या तरुण रुग्णांपैकी तब्बल २० टक्के तरुणांच्या दुखापतींमागे जिममधील चुकीचा व्यायाम हेच मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Also: निरोगी हृदयासाठी रोज ३० मिनिटांचा व्यायाम पुरेसा आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला!

अस्थिरोग विभागात ४० टक्के रुग्ण तरुण; दुखापतींचे प्रमाण चिंताजनक

चौधरी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण (OPD) विभागात येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ४० टक्के रुग्ण हे ३५ वर्षांपर्यंतचे तरुण आहेत. त्यांच्यामध्ये जिममध्ये व्यायाम केल्यानंतर विविध प्रकारची पाठदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी, सांधेदुखी आणि स्नायूंचे विकार सुरू झाल्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आजकालच्या युगात तरुणांमध्ये जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याची क्रेझ आणि संख्या झपाट्याने वाढते आहे. मात्र, त्यातून निर्माण होणाऱ्या दुखापतींचे हे प्रमाण आरोग्य यंत्रणेसाठी आणि पालकांसाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरत आहे.

शरीर घडवताना कळत-नकळत शरीरालाच मोठी इजा पोहोचवली जात आहे. अवघ्या काही महिन्यांत किंवा कमी वेळात आकर्षक शरीरयष्टी (Body) कमावण्याच्या घाईत आणि प्रयत्नात तरुणांकडून अवास्तव व जड वजन उचलले जाते. व्यायामाची योग्य पद्धत माहिती नसतानाही केवळ सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून किंवा इतरांचे अंधानुकरण करून व्यायाम केला जातो. शरीराची ठेवण आणि पोश्चर (Posture) चुकीचे असताना वजन उचलणे, क्षमतेपेक्षा अधिक ताण घेणे आणि व्यायामाची तीव्रता अचानक वाढवणे यामुळे स्नायू (Muscles), सांधे (Joints) आणि अस्थिबंधनांवर (Ligaments) अतिरिक्त ताण पडतो. परिणामी, गंभीर स्वरूपाच्या अस्थिरोगाच्या तक्रारी घेऊन तरुणांना रुग्णालयाची पायरी चढावी लागत आहे.

तरुणांकडून होणाऱ्या ४ प्रमुख चुका:

१. क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलणे: शरीराची ताकद न बघता लगेच जड डंबेल किंवा बारबेल उचलणे.

२. चुकीची पद्धत (Wrong Form/Posture) न टाळणे: व्यायामाच्या चुकीच्या पोश्चरमुळे मणक्यावर व सांध्यांवर थेट ताण येणे.

३. पुरेशी विश्रांती न घेणे: वर्कआउटनंतर स्नायूंना रिकव्हरीसाठी लागणारा वेळ व विश्रांती न देणे.

४. अप्रशिक्षित ट्रेनर किंवा मार्गदर्शनाशिवाय व्यायाम: प्रशिक्षित ट्रेनरच्या सल्ल्याशिवाय परस्पर जड वजन उचलणे.

‘फिटनेसच्या नादात दुखापतींचा धोका’ : डॉ. संजीव चौधरी यांचा इशारा

जिममधील दुखापतींवर आणि चुकीच्या पद्धतींवर बोलताना डॉ. संजीव चौधरी (ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ व संचालक, चौधरी रुग्णालय, नागपूर) यांनी तरुण आणि पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

“व्यायाम आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असला तरी तो चुकीच्या पद्धतीने केला तर शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे जिममध्ये जाण्यापूर्वी आणि वजन उचलण्यापूर्वी शरीराची क्षमता लक्षात घेणे, योग्य प्रशिक्षण घेणे व दुखापतीची लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. जिममध्ये व्यायाम करताना स्नायूंवर हलका ताण येणे अपेक्षित असले, तरी सांध्यात तीव्र वेदना, सूज, हालचालींमध्ये अडथळा किंवा सतत वाढत जाणारे दुखणे याकडे दुर्लक्ष करू नये. ‘दुखत आहे म्हणजे व्यायामाचा चांगला परिणाम होतोय’ या चुकीच्या गैरसमजामुळे अनेकदा तरुण दुखापतीनंतरही व्यायाम सुरू ठेवतात. परिणामी साधी दुखापत गंभीर होण्याचा धोका वाढतो. शरीराच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करून केलेला व्यायाम शरीरासाठी प्राणघातक किंवा अपंगत्व आणणारा ठरू शकतो,” असा मोलाचा सल्ला डॉ. चौधरी यांनी दिला.

जिम ट्रेनर्सच्या पात्रतेवर निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्ह!

या संपूर्ण प्रकरणामुळे आता जिम प्रशिक्षक (Gym Trainers) आणि त्यांच्या पात्रतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिममध्ये येणाऱ्या व्यक्तीच्या शरीराची रचना, क्षमता आणि वैद्यकीय इतिहास पाहून वजनाचे प्रमाण ठरवणे आणि व्यायामाची तीव्रता हळूहळू वाढवणे ही ट्रेनरची मुख्य जबाबदारी असते. मात्र, सध्या गल्लीबोळांत सुरू झालेल्या अनेक जिममध्ये प्रशिक्षकांना व्यायामशास्त्र (Kinesiology/Biomechanics) आणि दुखापत टाळण्याच्या पद्धतींचे पुरेसे ज्ञान आहे का, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तरुणांमध्ये जिमची वाढती लोकप्रियता पाहता केवळ शरीरयष्टीकडे आणि दिपावण्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. व्यायाम करणाऱ्यांची सुरक्षितता, प्रशिक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि प्रमाणित व्यायामपद्धती याकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. हे चित्र केवळ एका रुग्णालयापुरते किंवा नागपूर शहरापुरते मर्यादित नसून, संपूर्ण राज्यभरात जिममुळे तरुणांना दुखापती होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे इतर अस्थिरोग तज्ज्ञांचेही म्हणणे आहे.

Read Also: निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली: ‘हेल्दी डाएट प्लेट’; जाणून घ्या कस असावं तुमचं रोजचं ताट!