Home पॉलिटिकल पोस्ट लाडक्या बहिणींवर दादा रूसले… बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे कधी येणार?

लाडक्या बहिणींवर दादा रूसले… बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे कधी येणार?

नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला थेट बँक खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. सुरुवातीला वेळेवर हे पैसे जमा होत असल्याने महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या योजनेतील हप्ते वेळेत मिळण्यात अडथळे येत असल्याचं चित्र दिसत आहे.

ऑगस्ट महिना संपून सप्टेंबरचा पहिला आठवडा संपला तरी महिलांच्या खात्यात अद्याप ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. जुलैपर्यंतचे सर्व हप्ते नियमितपणे वितरीत झाले होते. परंतु, ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता न आल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, आठ दिवस उलटून गेल्यानंतरही खात्यात पैसे न आल्याने लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत की, “आता पैसे नेमके कधी मिळणार?”

2100 रूपये महिना कधी मिळणार?

ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरु ठेवण्याचा सरकारचा ठाम संकल्प आहे. या योजनेचा लाभ महिलांपर्यंत अखंडित पोहोचावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये लवकरच लाभार्थींना मिळतील, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं. लाडकी बहीण योजनेत 1500 रुपयांच्या हप्त्याबरोबरच अजून एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. निवडणूक जाहीरनाम्यात 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याबाबत विचारणा केली असता मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या की, “जाहिरनामा हा पाच वर्षांसाठी असतो. 2100 रुपयांचे आश्वासन आम्ही नक्कीच पूर्ण करू. मात्र, सध्या आमचं प्राधान्य हे लाभार्थ्यांना नियमितपणे हप्ता पोहोचवण्याचं आहे. योग्य वेळी 2100 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळेल.”

सरकारमध्ये स्पष्टता नाही…

दरम्यान, काही महिलांचा प्रश्न आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये एकत्र दिले जातील का? मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकार याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील लाखो महिला या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळवत आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर मिळणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. सरकारकडून ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकर वितरीत केला जाईल, अशी खात्री दिल्यानंतर महिलांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पैसे न मिळाल्याने निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारकडून अधिकृत घोषणा होणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.