नागपूर : सरकारवरचा दबाव वाढत असताना अचानक एक निर्णय झाला… आणि क्षणात आंदोलनाचा रंग बदलला. ज्यामुळे आझाद मैदानात जमलेल्या लाखो मराठा बांधवांनी जल्लोषात जयजयकार केला. अखेर पाच दिवस चाललेलं मराठा आंदोलन थांबलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू केलेलं बेमुदत उपोषण सरकारनं जीआर काढताच संपुष्टात आलं. पण, या विजयामागची कहाणी नेमकी कशी आहे? सरकारनं घेतलेला निर्णय किती भक्कम आहे? आणि या पार्श्वभूमीवर सत्ताकारणी नेमकं काय म्हणालेत ते सविस्तर जाणून घेऊया…
मनोज जरांगे यांना आनंदाश्रूंचे भरते
“जिंकलो रे राजेहो…! आज कळलं, गरिबांची ताकद किती मोठी आहे,” अशा भावूक शब्दांत जरांगे यांनी लाखो मराठा बांधवांसमोर आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी संपूर्ण मैदान दणाणून गेलं आणि टाळ्यांचा गजर सुरू झाला.
संविधानिकतेवरही जीआर टिकण्याचा विश्वास!
सरकारनं जरांगे यांच्या मागण्यांना मान्यता देत, अखेर जीआर काढला. हा जीआर संविधानिक पातळीवरही टिकेल, असा विश्वास राज्य सरकारनं व्यक्त केला आहे. राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांनी गुलाल उधळून विजयाचा उत्सव साजरा केला.
सत्ताकारण्यांचा सकारात्मक सूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मंत्रिमंडळ उपसमितीनं प्रत्येक बाबीचा सखोल अभ्यास करून निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील प्रमुख प्रश्न सुटला असून, ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “पहिल्या दिवसापासून आम्ही सकारात्मक भूमिकेत होतो. आमचं सरकार इतर समाजांना त्रास न देता, मराठा समाजासाठीही तोडगा काढू शकेल याचा आम्हाला विश्वास आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपसमितीनं घेतलेल्या निर्णयाशी जरांगे सहमत झाले आहेत. सरकार सर्वसमावेशक निर्णय घेण्यास कटिबद्ध आहे.”
ओबीसी महासंघाची सावध भूमिका
दरम्यान, अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, “ओबीसी समाजाचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. तरीदेखील आम्ही कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊ. आमचं उपोषण सुरूच राहील आणि गरज भासल्यास आम्ही न्यायालयाचंही दार ठोठावू.”










