Home महाराष्ट्र पोस्ट नागपूर पोस्ट नागपूरच्या वास्तूची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद… शहराच्या वैभवात भर

नागपूरच्या वास्तूची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद… शहराच्या वैभवात भर

नागपूर : नागपूर केवळ आता ऑरेंज सिटी आणि टायगर कॅपीटल म्हणूनच नाही तर विकासाचं खरंखुरं प्रतीक असलेलं ‘डेव्हलपमेंट सिटी’ म्हणून देखील नावारूपास येत आहे. प्रतिष्ठीत गिनीज वर्ल्ड रेकार्डमध्ये नागपुरातील नागपूर-कामठी रोडवरील डबल डेकर फ्लायओव्हरची नोंद झाल्याने नागपूरच्या वैभवात आणखी भर घातली आहे. महाराष्ट्र मेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या सहकार्याने साकारलेल्या या उड्डाणपूलाला हा बहुमान प्राप्त झाला आहे.

हा डबल डेकर व्हायाडक्ट 3.14 किलोमीटर लांब असून, वर्धा रोडवरील छत्रपती नगर, उज्ज्वल नगर आणि जयप्रकाश नगर या तीन मेट्रो स्थानकांवरून जातो. या प्रकल्पात तीन स्तरांची वाहतूक व्यवस्था आहे. या रचनेमुळे नागपूर शहरातील वाहतूक कोंडी कमी झाली असून प्रवासाचा वेळही कमी झाला आहे.

वरचा स्तर : मेट्रो रेल्वे मार्ग (उंची 20 मीटर)

मधला स्तर : महामार्ग उड्डाणपूल (उंची 9 मीटर)

खालचा स्तर : विद्यमान रस्ता

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मान्यता : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने या डबल डेकर व्हायाडक्टला “जगातील सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट” म्हणून मान्यता दिली आहे. याशिवाय, या प्रकल्पाला आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद मिळाली आहे.

2024 ला झाले उद्घाटन : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन 5 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे अधिकारी ऋषीनाथ यांनी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांना प्रमाणपत्र प्रदान केले. हा प्रकल्प नागपूर शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारा ठरला आहे आणि इतर शहरांसाठी आदर्श मानला जातोय.

प्रवाशांच्या वेळेची बचत : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी डबल डेकर उड्डाणपूल सुरू झाल्याने प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत झाली आहे. पूर्वी सदर ते ऑटोमोटीव्ह चौक दरम्यान 3.14 किलोमीटर अंतर कापायला जवळपास 20 ते 30 मिनीटे वेळ लागायचा. मात्र डबल डेकर उड्डाणपूलामुळे हे अंतर 10 मिनिटांवर आले आहे. सोबतच अपघाताची शक्यता देखील कमी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.