Home महाराष्ट्र पोस्ट रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा; सर्व शासकीय कार्यक्रम रद्द!

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा; सर्व शासकीय कार्यक्रम रद्द!

मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून, काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर रतन टाटा यांनी ट्विटवरुन त्यांची प्रकृती चांगली आहे असे देखील सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होती.

दरम्यान, मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी काल वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टाटा समूहाकडून निधनाची बातमी देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

राज्यात एक दिवसाचा दुखवटा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याची घोषणा केली. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. तसेच, रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईमध्ये होणारे सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली!

रतन टाटाजी यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांनी माझे मन भरून आले आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातमध्ये वारंवार भेटत होतो. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करत होतो. मला त्याचा दृष्टिकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो तेव्हाही हे संवाद सुरूच होते. अत्यंत वेदना झाल्या. श्री रतन टाटाजी यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आणि परत देण्याची त्यांची आवड. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक कारणांमध्ये ते आघाडीवर होते, असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली!

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!