जळगावच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह ४८ जणांना एसआयटीची नोटीस
बोगस शालार्थ आयडी प्रकरण
जळगाव : राज्यातील शिक्षण विभागात खळबळ उडवून देणाऱ्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी आता एसआयटीने आपला मोर्चा जळगावकडे वळवला आहे. जळगाव माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांसह तत्कालीन ११ शिक्षणाधिकाऱ्यांसह एकूण ४८ जणांना एसयाटीने नोटीसा वाजवल्या असून, १५ ते १८ एप्रिल दरम्यान नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यालयात ही सुनावणी होणार आहे.
राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे बोगस आयडी तयार करूव कोट्यवधी रूपयांचा पगार लाटल्याचा प्रकार समोर आला होता. सन २०१३ ते २०२६ या कालखंडात नाशिक विभागातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सुमारे ८९२ कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील मध्यमिक शिक्षण विभागातील ४८ जणांचा समावेश असून, या सर्वांना आता सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे अधिकारी आहेत रडारवर
बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी एसयाटीने ज्या ४८ जणांना नोटीस बजावली आहे, त्यात सध्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हण यांच्यासह ११ तत्कलीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. प्रामुख्याने आर.डी.विसपुते, एस.बी.हिंगोणेकर, एस.टी.वराडे, डी.पी.महाजन, बी.जे.पाटील, बी.एस.अकलाडे, डॉ. नितीन बच्छाव, सचिन परदेशी, डॉ. किरण कुंवर, डॉ. एम. व्ही. कदम यांच्यासह ११ उपशिक्षणाधिकारी, ३कक्षाधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ सहायक अशा एकूण ४८ कर्मचाऱ्यांना आता नाशिकला होणाऱ्या सुनावणीसाठी सामोरे जावे लागणार आहे. यासोबतच चंद्रकांत पाटील, डी.बी.पाटील, अतुल पाटील, घनश्याम विसपुते या कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश आहे.
तपासासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ
ऑक्टोंबर २०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला होता. प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने शासनाने एसआयटीला तपासासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. जळगावच्या १० शाळांमधील मुख्याध्यापकांचीही यापूर्वी चौकशी करून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.
नाशिकला सुनावणीसाठी रवाना
या प्रकरणातील जळगावाचे संबंधित अधिकारी सुनावणीसाठी नाशिककडे रवाना झाले आहेत. १५ ते १८ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत ही सखोल सुनावणी चालणार आहे. बोगस भरती आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणाने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.










