Home महाराष्ट्र पोस्ट महाराष्ट्रातील १० सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित; पंतप्रधानांनी सांगितले आणखी ९०० वैद्यकीय जागांची...

महाराष्ट्रातील १० सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित; पंतप्रधानांनी सांगितले आणखी ९०० वैद्यकीय जागांची भर पडणार!

नागपूर/शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (९ ऑक्टोबर) दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील १० सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करण्याचा आरंभ केला आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS), मुंबई आणि महाराष्ट्राच्या विद्या समीक्षा केंद्र (VSK) चे उद्घाटन केले. या शैक्षणिक प्रकल्पांसोबतच नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा समावेश असल्याचे समजते.

दरम्यान, यावेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.

मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण उपलब्ध!

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत-जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत हे सरकारचे प्राधान्य आहे. एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न तरुण पूर्ण करतील, असेही प्रधानमंत्री यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले या दिग्गजांच्या आशीर्वादामुळेच महाराष्ट्रात प्रगतीची कामे सुरू असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा ‘महायज्ञ’

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी सरकारने आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा ‘महायज्ञ’ सुरू केला आहे. लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहेत. यामुळे अंबरनाथ (ठाणे), मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे लाखो लोकांसाठी सेवेची केंद्रे बनतील. महाराष्ट्रात आणखी ९०० वैद्यकीय जागांची भर पडणार असून एकूण वैद्यकीय जागा ६००० झाली आहेत.

काँग्रेस बेजबाबदार पक्ष!

देशाचा कल कुणीकडे आहे, हे हरयाणाच्या निकालाने दाखवून दिले. काँग्रेस समाजात द्वेष पसरविणारा बेजबाबदार पक्ष असल्याची टीका देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केली.