नागपूर: अनैतिक संबंधांच्या संशयातून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. आरोपीने या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेले अपील न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावले आहे. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे आणि न्यायमूर्ती रोहित जोशी यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ही धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात घडली होती.
हेही वाचा: क्रिप्टो विश्वात खळबळ! बायनान्सवर महादरोडा; २० मिनिटांत ५६ हजार कोटींची लूट!
भरबाजारात मागून येऊन केला जीवघेणा हल्ला
या प्रकरणातील आरोपीचे नाव रामा कांढो कुड्यामी (वय ४१) असे असून, तो ताडगाव (ता. भामरागड) येथील रहिवासी आहे. तर झुरु आत्राम असे मृत शिक्षकाचे नाव आहे. २५ जुलै २०१९ रोजी शिक्षक झुरु आत्राम हे एका दुकानाजवळ बसलेले असताना, आरोपी रामाने मागून येऊन त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या गंभीर हल्ल्यात आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला होता आणि घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.
नक्षलवाद्यांनी हत्या केल्याचा आरोपीचा बनाव अंगलट
सुरुवातीला सत्र न्यायालयाने आरोपीला हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ताडगाव हा नक्षलग्रस्त भाग असून ‘नक्षल सप्ताहा’दरम्यान नक्षलवाद्यांनी ही हत्या केली असावी आणि आपल्याला या प्रकरणात खोट्या आरोपाखाली अडकवण्यात आले आहे, असा बनाव आरोपीने न्यायालयात केला होता. मात्र, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपीला स्वतः कुऱ्हाडीने वार करताना पाहिले होते, त्यामुळे त्याचा हा दावा टिकू शकला नाही.
संवेदनशील भागातील गुन्हेगारीला न्यायालयाची चपराक
गडचिरोलीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागात नक्षलवादाच्या नावाखाली वैयक्तिक वैमनस्यातून गुन्हे करणे आणि नंतर नक्षलवाद्यांवर आळ ढकलणे अशा प्रवृत्तींना या निकालामुळे मोठी चपराक बसली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण ताडगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, अशा दुर्गम भागातही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न घाबरता दिलेली साक्ष आणि पोलिसांनी गोळा केलेले पुरावे यामुळे गुन्हेगाराला कायद्याचा योग्य तो धडा मिळाला असून न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
फॉरेन्सिक अहवाल आणि भक्कम पुराव्यांमुळे सुटका नाही
आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त केली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात जप्त केलेली कुऱ्हाड आणि आरोपीच्या कपड्यांवर मानवी रक्त आढळून आले होते. हे रक्ताचे नमुने गुन्ह्याचा भक्कम पुरावा ठरले. उच्च न्यायालयाने आरोपीविरोधात सर्व पुरावे आणि साक्षीदार अतिशय भक्कम असल्याचे स्पष्ट केले आणि सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा योग्य ठरवत ती कायम ठेवण्याचा निर्णय दिला.
हेही वाचा: दुष्काळ आणि खासगी फायनान्सच्या त्रासाला कंटाळून लातूरमध्ये तरुणाची आत्महत्या










