शिरुर अनंतपाळ ( लातूर) : लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंकुलगा राणी येथे एका २८ वर्षीय तरुणाने घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दत्ता सूर्यकांत कुंभार असे या मृत युवकाचे नाव होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, खासगी फायनान्सच्या त्रासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा: गर्भातच बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा संताप! नागपुरातील रुग्णालयात नेमकं काय घडलं?
चिठ्ठीत मांडली व्यथा; फायनान्सचा लाय त्रास
आत्महत्या करण्यापूर्वी दत्ता कुंभार यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्यांनी दुष्काळामुळे आपण कर्जात बुडालेलो असून, खासगी फायनान्सचा खूप त्रास होत असल्याचे म्हटले होते. “मी दुष्काळामुळे कर्जात, फायनान्सचा लाय त्रास,” असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते.
सहा लाख वीस हजारांचे होते कर्ज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता कुंभार यांनी तीन ते चार खासगी फायनान्सेसकडून एकूण ६ लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. याच कर्जाच्या विवंचनेला आणि त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी चुलते चंद्रकांत कुंभार यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा अंकुलगा राणी येथे त्यांच्या पार्थिवरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे वाढले होते नैराश्य
सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे दत्ता यांच्या उत्पन्नाचे साधन पूर्णपणे कोलमडले होते. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे त्यांना अशक्य होऊन बसले होते. फायनान्स कंपन्यांकडून वारंवार होणाऱ्या त्सुनामी सारख्या तपासाने आणि वसुलीच्या तपासाने त्यांच्या मनावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला होता.
कुटुंबाचा आधार गेला; शासनाकडे कर्जमाफीची मागणी
दत्ता कुंभार हे घरातील एकमेव कर्ते पुरुष होते, त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा मोठा आधार हरपला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शासनाने या दुःखी कुटुंबाला आधार देत सर्व कर्ज माफ करावे, अशी आर्त विनंती या चिठ्ठीतून करण्यात आली आहे.
स्थानिक स्तरावर मदतीचा व सुरक्षेचा टाहो
या दुर्दैवी घटनेनंतर ग्रामीण भागातील खासगी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अवाजवी व्याजदर आणि वसुलीच्या जाचक पद्धतींमुळे सर्वसामान्य शेतकरी व तरुण कसे पिचले जात आहेत, याचा संतापजनक प्रत्यय यातून आला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अशा बेकायदेशीर फायनान्सचा ब बडगा उगारून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
हेही वाचा: राज्यात महामार्गांवर अपघातांचा कहर! चार वर्षांत ५८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू










