Home हेल्थ पोस्ट मासिक पाळीत मजुरी बुडू नये म्हणून जालन्यात १०७ ऊसतोड महिलांनी काढली गर्भपिशवी;...

मासिक पाळीत मजुरी बुडू नये म्हणून जालन्यात १०७ ऊसतोड महिलांनी काढली गर्भपिशवी; संतापजनक वास्तव समोर!

जालना: पोटाची खळगी भरण्यासाठी आणि डोक्यावरील कर्जाचे शुक्लकाष्ठ फेडण्यासाठी बीड, जालन्यासह मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांना दरवर्षी अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करावा लागतो. परंतु, जालना जिल्ह्यातून समोर आलेली एक अत्यंत संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी बातमी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांमुळे काम बंद राहून मजुरी बुडू नये, म्हणून जालना जिल्ह्यातील तब्बल १०७ ऊसतोड कामगार महिलांनी आपले गर्भाशय (गर्भपिशवी) काढून टाकल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या एका संस्थेने हा भीषण प्रकार उजेडात आणला आहे.

Read Also: उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका टाळायचाय? आहारात करा ‘हे’ ५ महत्त्वाचे बदल; तज्ज्ञांचा सल्ला

१४ महिन्यांत १०७ महिलांच्या शस्त्रक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, घनसावंगी तालुक्यातील ६३ आणि परतूर तालुक्यातील ४४ अशा एकूण १०७ ऊसतोड महिलांनी १ ऑगस्ट २०२५ ते २५ ऑक्टोबर २०२६ या १४ महिन्यांच्या कालावधीत आपले गर्भाशय काढून टाकले आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये ही गंभीर बाब घडत असतानाही स्थानिक आरोग्य विभागाला याचा सुगावा कसा लागला नाही, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून आणि सामाजिक संस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

महिलांची आपबिती: मजुरीचे नुकसान आणि खासगी डॉक्टरांचा सल्ला

या समस्येचा सामना करणाऱ्या एका पीडित ऊसतोड कामगार महिलेने आपली व्यथा मांडताना सांगितले, “ऊसतोडीचे काम करताना मासिक पाळीच्या वेळी पोटात असह्य वेदना होत होत्या. त्या ४ दिवसांत काम बंद राहिल्याने जवळपास आठ ते दहा दिवसांची मजुरी बुडत होती. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि या त्रासातून कायमची सुटका व्हावी, यासाठी आम्ही खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात जाऊन गर्भपिशवी काढून घेतली.”

कर्जाचे ओझे आणि मूलभूत सुविधांचा अभाव

ऊसतोड हंगामापूर्वी कामगार जोडप्यांकडून मुकादमाकडून उचल (अ‍ॅडव्हान्स) घेतलेली असते. ही उचल फेडण्यासाठी आणि हक्काची मजुरी बुडू नये म्हणून या महिलांना प्रचंड शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. ऊसतोडीच्या फडात महिलांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, स्वच्छतागृहांचा आणि मूलभूत सुविधांचा मोठा अभाव असतो, तसेच त्यांच्या आरोग्याची कोणतीही हमी नसते. अशा बिकट परिस्थितीत, मासिक पाळीच्या काळात काम थांबल्यास दंड किंवा मजुरी न मिळण्याची भीती असते, ज्यामुळे कर्जाचे ओझे अधिक वाढेल या दडपणाखाली या महिलांनी थेट गर्भाशयाची शस्त्रक्रिया (Hysterectomy) करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

आरोग्य प्रशासनाचा इशारा

या धक्कादायक प्रकारावर प्रतिक्रिया देताना जालना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे म्हणाल्या, “ऊसतोड कामगार महिलांनी अशा प्रकारे गर्भपिशवी काढून घेण्याचा घातक निर्णय घेऊ नये. गर्भाशय काढल्याने मासिक पाळी जरी बंद होत असली, तरी या शस्त्रक्रियेमुळे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अत्यंत गंभीर आणि दीर्घकालीन दुष्परिणाम होतात.”

या दुर्दैवी घटनेमुळे ऊसतोड कामगारांचे आरोग्य, त्यांच्या मजुरीचे नियमन आणि प्रशासकीय दुर्लक्ष यावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Also: तरुणींमध्ये वाढतोय ‘प्रोलॅक्टिन’ हार्मोन बिघाडाचा धोका; मातृत्वाच्या सुखाला मुकण्याची भीती!