नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) विविध परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि कथित गैरप्रकारांच्या तक्रारी समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करणे, मुलाखती पुढे ढकलणे आणि निवड प्रक्रिया प्रभावित होण्याचे प्रकार घडत आहेत. या निर्णयांचा मात्र परीक्षेची प्रामाणिकपणे तयारी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना फटका बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करून राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांना आता नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे राज्यसेवा २०२५च्या मुलाखती वेळेत घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी पात्र उमेदवारांकडून करण्यात आली आहे.
एमपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि कथित गैरप्रकारांच्या तक्रारींमुळे काही परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर काही परीक्षांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाने कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. मात्र, गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करताना त्याचा परिणाम प्रामाणिकपणे परीक्षा देऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांवर होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
राज्यसेवा २०२५च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांनी उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीची मागणी केली आहे. त्यानंतर मुलाखतीच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. निवड प्रक्रियेत काही उमेदवारांविरोधात तक्रारी किंवा आक्षेप असल्यास त्यांची स्वतंत्र चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी. मात्र, त्यासाठी संपूर्ण निवड प्रक्रिया स्थगित करू नये, अशी मागणी पात्र उमेदवारांनी केली आहे.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत उमेदवारांची अस्वस्थता
मुलाखतीनंतर नियुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये सध्या अस्वस्थता आहे. अनेक उमेदवारांनी अनेक वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी केली असून, कठोर परिश्रम घेत राज्यसेवेच्या अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारली आहे. मात्र, निवड प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे त्यांच्या पुढील नियोजनावर परिणाम होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर पात्र उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचे वृत्त आहे. राज्यसेवा २०२५च्या मुलाखती वेळेत घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पेपरफुटी अथवा अन्य गैरप्रकार आढळल्यास त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यास त्यांचा विरोध नाही. मात्र, काही व्यक्तींच्या कथित गैरप्रकाराचा परिणाम संपूर्ण उमेदवारवर्गावर होऊ नये. दोषींवर कारवाई करताना प्रामाणिक आणि पात्र उमेदवारांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका उमेदवारांनी मांडली आहे.
दरम्यान, राज्यसेवा २०२५च्या मुलाखती आणि त्यानंतरची नियुक्ती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी आता पात्र उमेदवारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एमपीएससी आणि संबंधित यंत्रणा या मागणीबाबत कोणती भूमिका घेते, याकडे राज्यसेवा परीक्षेतील पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
Read Also: SET परीक्षेला पुन्हा ब्रेक! चौथ्यांदा तारीख बदलली; २५ ऑक्टोबरला परीक्षा










