Home महाराष्ट्र पोस्ट नागपूर पोस्ट अनंत भोयर यांना स्व.नाशिकराव तिरपुडे जीवनगौरव पुरस्कार

अनंत भोयर यांना स्व.नाशिकराव तिरपुडे जीवनगौरव पुरस्कार

नागपूर : माजी उपमुख्यमंत्री स्व. नाशिकराव तिरपुडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून युगांतर शिक्षण संस्थेद्वारा साहित्यिक तथा सेंद्रिय शेतकरी अनंत भोयर यांना स्व.नाशिकराव तिरपुडे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भव्य सोहोळ्यात सदर पुरस्कार संस्थाध्यक्ष मा. कलशराव तिरपुडे, कार्यकारी अध्यक्षा मा.सौ. वनिताताई तिरपुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपाध्यक्ष सर्वश्री गणेशराव गौरखेडे, सचिव जयंतराव कोंबाडे व अविनाशराव नागदिवे, घनाताई तिरपुडे तसेच युगांतर शिक्षण संस्थेच्या इतर सदस्यांची आवर्जून उपस्थिती होती. सदर पुरस्काराचे स्वरूप, गौरवपत्र, रजत सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ व एक्कावन हजार रूपये असे होते.

अनंत भोयर हे काटोल तालुक्यातील कचारी सावंगा या त्यांच्या जन्मगावी गेल्या २२ वर्षांपासून विविध प्रयोगांसह सेंद्रिय शेती करीत असून ते बीजोत्सवासारख्या चळवळीद्वारे विषमुक्त, सुरक्षित अन्न व सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार करीत आहेत. एवढेच नव्हे, तर ते सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन, प्रक्रिया व मूल्यवर्धनासंबंधी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करीत आहेत.

अनंत भोयर यांचे ग्रामीण कथा, कादंबरी, नाटक व कृषिविषयक बरेचसे लेखन असून ते विविध विद्यापिठे आणि महाविद्यालयातून, कृषी, काष्ठशिल्प, बासरीवादन इ. विषयांवरील कार्यशाळा सातत्याने घेत असतात. यापुर्वी त्यांना सेंद्रिय शेती कृषिभुषण हा राज्यपुरस्कार आणि ‘धरतीमित्र’ हा राष्ट्रीय पुरस्कारदेखील प्राप्त झालेला आहे. सदर पुरस्कार समारंभाच्या यशस्वितेसाठी तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री धुर्वे सर, प्राध्यापक सर्वश्री दिगंबरराव टुले, सचीनराव हुंगे आणि समस्त प्राध्यापकवृंदाचा मोठा सहभाग होता