Home क्राईम पोस्ट बार्शीत डांसरच्या घरासमोर माजी उपसरपंचाची आत्महत्या; सोन्या-चांदीचे दागिने, महागडा मोबाईल दिल्याचा खुलासा

बार्शीत डांसरच्या घरासमोर माजी उपसरपंचाची आत्महत्या; सोन्या-चांदीचे दागिने, महागडा मोबाईल दिल्याचा खुलासा

नागपुर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे (वय ३५, रा. माणेगाव) या माजी उपसरपंचाने बुधवारी सकाळी बार्शी तालुक्यातील सासुरे गावात नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिच्या घरासमोरच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नर्तिका पूजाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

घटनास्थळावर गाडीमधून मृतदेह

बुधवारी सकाळी सासुरे गावातील रहिवाशांना पूजाच्या घरासमोर एक चारचाकी गाडी उभी असल्याचे दिसले. गाडीच्या ड्रायव्हर सीटवर गोविंद बर्गे हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या उजव्या कपाळावर गोळी लागलेली होती. त्यांनी पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

प्रेमसंबंधातून वाद?

गोविंद बर्गे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. तरीही गेल्या दीड वर्षांपासून त्यांची ओळख नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी झाली होती. या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याचं सांगितलं जात आहे. गोविंद यांनी पूजाला सोन्या-चांदीचे दागिने आणि तब्बल दोन लाख रुपये किमतीचा मोबाईल फोन भेट दिला होता. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये संपर्क नव्हता. यामुळे गोविंद अस्वस्थ होते, असं त्यांच्या मेहुण्याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं आहे.

घर नावावर करण्याचा तगादा

फिर्यादीत आणखी एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. पूजाने गोविंद यांच्याकडे त्यांच्या घरावर आपलं नाव करून देण्यासाठी दबाव टाकला होता. या कारणावरून गोविंद तणावाखाली होते. अखेर ते बुधवारी सकाळी सासुरे येथे पोहोचले आणि पूजाच्या घरासमोरच गाडीत बसून स्वतःच्या डोक्यात पिस्तुलाची गोळी झाडून घेतली. जागीच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांचा तपास सुरू

या घटनेनंतर गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पूजा गायकवाड हिला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून हे प्रकरण वैयक्तिक वादातून घडल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त करण्यामागे नेमकं कारण काय, तसेच पूजा गायकवाड हिची भूमिका काय होती, हे समजून घेण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

परिसरात खळबळ

गोविंद बर्गे हे गेवराई तालुक्यात माजी उपसरपंच राहिले होते. स्थानिक पातळीवर ते राजकीयदृष्ट्या ओळखले जात होते. त्यांच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर गेवराईसह बार्शी परिसरात आश्चर्य व धक्का व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांच्या चर्चेत या घटनेचे विविध तर्क वितर्क लावले जात असून, यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.