Home महाराष्ट्र पोस्ट नागपूर पोस्ट सोलार कंपनीत मत्यूचं उत्पादन? स्फोटात एकाचा मृत्यू, सुरक्षा वाऱ्यावर!

सोलार कंपनीत मत्यूचं उत्पादन? स्फोटात एकाचा मृत्यू, सुरक्षा वाऱ्यावर!

नागपूर : नागपूर–अमरावती महामार्गावरील सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये काल मध्यरात्री मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बाजारगाव जवळ असलेल्या या बारूद आणि शस्त्रसाठा तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोट इतका भयंकर होता की, स्फोटातील मलबा महामार्गावर उडाला. आजूबाजूच्या गावातील घरांना हादरा बसला. अनेक घरांच्या काचा देखील फुटल्या… या स्फोटात आतापर्यंत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर 4 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सोलार कंपनीत वारंवार अशा घटना घडत असल्यानं ही मृत्यूची तर कंपनी नाही ना… अशी भावना नागरिकांमध्ये आहे. तुम्हीच बघा कंपनीत स्फोट झाल्यानंतरची ही दृश्ये…

सायरन वाजल्यानं इतर कामगार सतर्क                                                                                        अमरावती मार्गावर बाजारगाव येथे सोलार एक्सप्लोजिव्हचे युनीट आहे. तेथे विविध स्फोटके, ग्रेनेइस, ड्रोन इत्यादींचे उत्पादन होते. त्यातीलच एका यूनीटमध्ये रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यावेळी रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी विविध युनिटमध्ये काम करत होते. दरम्यान स्फोटाचा भयंकर आवाज आला. तातडीने सायरन वाजवून इतर कामगारांना बाहेर काढण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, जवळपास 15 जखमींना तेथून बाहेर काढण्यात आले. ते सर्वजण स्फोट झालेल्या इमारतीच्या 200 मीटर परिसरात असलेल्या लॅबमध्ये काम करत होते. स्फोटाचे आवाज आजूबाजूच्या गावांमध्ये देखील ऐकू आले. त्यामुळे अनेकजण घराबाहेर आले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आजपर्यंत आम्ही असा आवाज ऐकला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांचे नातेवाईक कंपनीत कामाला असल्याने त्यांच्या मनात धडकी भरली होती. सद्यस्थितीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अनिल देशमुख यांची घटनास्थळी धाव                                                                                          माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रूग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. तसेच कंपनीतील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह देखील त्यांनी उपस्थित केले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून श्रद्धांजली                                                                      “या दुर्घटनेत जीव गमावलेल्या मयूर गणवीर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. प्रशासनाच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आली असून मी सातत्याने संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मी प्रशासनाला दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही प्रार्थना.”