नागोया : नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली श्रेष्ठता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. बुधवारी झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या शूर खेळाडूंनी आपली ताकद दाखवत देशासाठी सुवर्ण पदकांची कमाई केली. सचिन खिलारी आणि दिलीप गावित या मराठमोळ्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. या सोबतच सिमरन आणि प्रवीण कुमार यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने स्पर्धेत एकाच दिवशी ५ सुवर्णांसह एकूण १८ पदकांची कमाई केली असून, पदकतालिकेत पाचवे स्थान मिळवले आहे.
भारताने आतापर्यंत जिंकलेल्या १४ सुवर्ण पदकांपैकी १३ पदके एकट्या पॅरा ॲथलेटिक्समधून मिळवली आहेत. एकूण ६२ पदकांच्या कमाईमध्ये १३ सुवर्ण, २३ रौप्य आणि २६ कांस्य पदकांचा समावेश आहे.
Read Also: झिम्बाब्वेचा उडाला धुव्वा! भारताचा ९ विकेटांनी तुफानी विजय; शेफली-निकीचा नवा विश्वविक्रम!
गोळाफेकमध्ये भारताचा दबदबा: सचिन खिलारीचा नवा विक्रम!
पुरूषांच्या गोळाफेक F46 प्रकारात महाराष्ट्राच्या सचिन खिलारीने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेचा नवा विक्रम नोंदवत सुवर्ण पदक पटकावले. सचिनने १५.८७ मीटर अंतरावर गोळा फेकून हा पराक्रम केला.
या प्रकारात भारताने तिन्ही पदके पटकावत निर्विवाद वर्चस्व गाजवले:
- सचिन खिलारी: १५.८७ मीटर फेक (सुवर्ण पदक – नवा विक्रम)
- मोहम्मद मोसिंगनाकथने: १५.०६ मीटर फेक (रौप्य पदक)
- प्रवीण: १४.९४ मीटर फेक (कांस्य पदक)
दुसरीकडे, गोळाफेक F53 प्रकारात आयुष वर्माने ८.९६ मीटर फेक करत सुवर्ण पदक जिंकले. या स्पर्धेतील त्याचे हे दुसरे पदक ठरले.
दिलीपने फडकावला तिरंगा; उंच उडीत नवा रेकॉर्ड!
पुरूषांच्या १०० मीटर T47 प्रकारात दिलीप गावितने १०.६९ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकले. या स्पर्धेत भारताच्या मोहम्मद मोसिंगनाकथने १०.७२ सेकंदांसह रौप्य पदक मिळवले.
तसेच, उंच उडी T44/64 प्रकारात प्रवीण कुमारने २.०५ मीटरची उडी मारत स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला आणि सुवर्ण पदक जिंकले. याच प्रकारात भारताच्या बंटीने १.९२ मीटरची उडी मारत रौप्य पदक मिळवले.
सिमरनची विक्रमी सुवर्णधाव आणि कस्तुरीचे पॉवरलिफ्टिंगमध्ये यश!
महिलांच्या १०० मीटर T12 प्रकारात सिमरनने १२.०२ सेकंदांची नोंदवत सुवर्ण पदक जिंकले. स्पर्धेतील तिचे हे दुसरे सुवर्ण ठरले. मंगळवारी २०० मीटर T12 प्रकारात स्पर्धेत विक्रमासह सुवर्ण जिंकल्यानंतर १०० मीटरमध्येही तिच्या जोरदार कामगिरीमुळे इराणच्या सफारजादेह हिला मागे टाकले.
पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये पोलिओचा सामना करणाऱ्या कस्तुरी राजामणी हिने ६७ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. तसेच महिलांच्या १०० मीटर T35 प्रकारात प्रीती पाल हिने कांस्य पदक पटकावले.
नांदेडच्या भाग्यश्रीची छाप!
मुखेड तालुक्याची (नांदेड) भाग्यश्री जाधव हिने F34 गोळाफेकमध्ये ७.९१ मीटरची फेक करत रौप्य पदकाची कमाई केली. भाग्यश्री पुणे येथे मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आतापर्यंत तिने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये २५ सुवर्ण, ४ रौप्य व ७ कांस्य पदकांची कमाई केली आहे. यंदाच्या पॅरा आशियाई स्पर्धेत ती महाराष्ट्राची एकमेव महिला खेळाडू आहे.
तिरंदाजी, जलतरण आणि बॅडमिंटनमध्येही भारतीयांची चमक!
- पॅरा तिरंदाजी: दोन्ही हात नसलेल्या शीतल देवी व पायाल नाग यांनी महिला दुहेरी कम्पाउंड प्रकारात रौप्य पदक जिंकले.
- जलतरण: स्वी कार्तिक बुदिगिना याने पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक S9 प्रकारात दुसरे स्थान मिळवत रौप्य, तर हिमांशू नंदनने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक SB9 प्रकारात कांस्य पदक मिळवले.
- पॅरा बॅडमिंटन: कृष्णा नागर व शिवराजन सोलाइमलाई यांना दुहेरी SH6 प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
Read Also: झिम्बाब्वे चित्! महिला टी-२० मध्ये भारताचा थरारक विजय; दीप्ती-निकीच्या जोडीने पलटला सामना










