नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी करत विरोधकांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने मंगळवारी राजधानी दिल्लीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. संसद भवनापासून ते थेट निवडणूक आयोग मुख्यालयाकडे निघालेला हा महामोर्चा पोलिसांनी आकाशवाणी भवन आणि नीती आयोगाजवळ अत्यंत कडेकोट बंदोबस्त लावून रोखला. त्यानंतर संसद मार्गावर निर्माण झालेल्या अभूतपूर्व संघर्षामुळे विरोधकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. सलग ८ तासांच्या हायड्राम्यानंतर दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा यांच्यासह आघाडीच्या जवळपास ५० बड्या नेत्यांना आणि २५० हून अधिक खासदारांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. या ऐतिहासिक आणि नाट्यमय आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून येत्या ९ नोव्हेंबरला दिल्लीत महासभेची घोषणा करण्यात आली आहे.
संसद भवन ते आकाशवाणी भवन : कसा घडला दिवसभराचा घटनाक्रम?
-
दुपारी १२:०० वाजता (मोर्चाची सुरुवात) :
दुपारी १२ वाजेच्या सुमारास संसद भवनाच्या आवारातून विरोधी पक्षांचे सर्व खासदार, नेते आणि कार्यकर्ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या (निर्वाचन सदन) दिशेने निघाले. या मोर्चात काँग्रेस, समाजवादी पक्ष (SP), तृणमूल काँग्रेस (TMC), द्रमुक (DMK), माकप (CPM), भाकप आणि इतर मित्रपक्षांचे खासदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संसद मार्गावर उभारण्यात आलेल्या महाकाय लोखंडी बॅरिकेड्समुळे मोर्चा पुढे जाऊ शकला नाही.
-
दुपारी १२:२० वाजता (राहुल गांधींचे बॅरिकेडिंग स्टंट) :
पोलीस आणि सुरक्षा दलांनी रस्ता पूर्णपणे रोखल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पोलिसांच्या उंच बॅरिकेड्सवर चढून हातात तिरंगा फडकावला. राहुल गांधींनी बॅरिकेड्सवर चढून आंदोलकांचे नेतृत्व केल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह भरला, तर पोलिसांची मोठी पळापळ झाली.
-
दुपारी १२:३० ते १२:४५ वाजता (गनिमी कावा आणि आकाशवाणी भवनात प्रवेश) :
एकीकडे पोलीस रस्त्यावर नेत्यांना रोखत असतानाच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अचानक आपला मोर्चा आकाशवाणी भवनाच्या दिशेने वळवला. आकाशवाणी भवनाच्या गेट क्र. ३ जवळ पोहोचल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र गनिमी काव्याने राहुल, प्रियंका आणि इतर प्रमुख नेते आकाशवाणी भवनाच्या आवारात शिरले.
-
दुपारी १२:४५ वाजता (झाडाखाली ठिय्या आंदोलन) :
आकाशवाणी भवनाच्या आवारात मोकळ्या जागेत राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पवन खेडा, दीपेंदर हुड्डा हे झाडाखाली चटई टाकून ठिय्या आंदोलनाला बसले. त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत निवडणूक आयोग भेट देत नाही आणि ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही.
-
दुपारी २:३० वाजता (माध्यमांशी संवाद) :
झाडाखाली बसलेल्या राहुल गांधींनी माध्यमांच्या मायक्रोफोनसमोर येत सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. “लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही. देशातील मतदारांचा हक्क हिरावून घेण्याचे काम सध्या सुरू आहे,” असे राहुल गांधींनी स्पष्ट केले.
-
रात्री ८:०० ते १०:०० वाजता (पोलिसांची कारवाई व सुटका) :
सलग ८ तास चाललेल्या या आंदोलनानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी संपूर्ण आकाशवाणी भवन परिसर रिकामा करण्यासाठी मोठी मोहीम राबवली. पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह ५० हून अधिक प्रमुख नेत्यांना बसमध्ये बसवून ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास राहुल, प्रियंका आणि सुमारे २५० खासदारांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.
“भाजपचे मुख्य निवडणूक आयुक्त!”; घोषणांनी परिसर दणाणला
आंदोलनादरम्यान विरोधकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. “भाजपचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार”, “व्होट चोर, गादी सोड” अशा तुफान घोषणांनी संसद मार्ग आणि पटेल चौक परिसर दणाणून गेला. विरोधकांचा आरोप आहे की, निवडणूक आयोग निष्पक्ष राहिलेला नसून सत्ताधारी भाजपच्या तालावर नाचत आहे. मतदार यादीतील फेरफार आणि ईव्हीएम (EVM) संदर्भातील तक्रारींकडे आयोग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा गंभीर आरोप या वेळी नेत्यांनी केला.
आंदोलनात अचानक घडली नाट्यमय घडामोडी
-
आकाशवाणी भवनात प्रवेश : मोर्चा संपल्याचे चित्र निर्माण होत असतानाच राहुल गांधी यांनी अचानक आकाशवाणी भवनाच्या स्वागत कक्षाच्या दिशेने धाव घेतली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही ते आवारात दाखल झाले. काही वेळातच प्रियंका गांधीही त्यांच्या पाठोपाठ तिथे पोहोचल्या.
-
झाडाखाली आंदोलन आणि जेवणाची सोय : राहुल आणि प्रियंका गांधी थेट आवारातील झाडाखाली बसले. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. पोलिसांनी परिसर रिकामा करण्यास सांगितल्यावर आंदोलकांनी तिथून हटण्यास स्पष्ट नकार दिला. या दरम्यान नेत्यांसाठी बाहेरील स्टॉलवरून बिस्किटे, वेफर्स आणि पा पाण्याच्या बाटल्या मागवण्यात आल्या होत्या.
आघाडीच्या बड्या नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पोलिसांनी केवळ काँग्रेसच्याच नव्हे, तर ‘इंडिया’ आघाडीतील सर्व प्रमुख घटकांच्या नेत्यांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत नेले. यामध्ये प्रामुख्याने:
-
समाजवादी पक्ष : अखिलेश यादव
-
तृणमूल काँग्रेस : अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, महुआ मोईत्रा
-
काँग्रेस : के. सी. वेणुगोपाल, पवन खेडा, के. सुरेश, अमरिंदर सिंग राजा वारिंग, इम्रान प्रतापगडी, रणदीप सुरजेवाला
पुढील रणनीती : ९ नोव्हेंबरला दिल्लीत भव्य रामलीला सभा!
‘इंडिया’ आघाडीने या आंदोलनानंतर आपल्या पुढील देशव्यापी संघर्षाची रूपरेषा जाहीर केली आहे:
-
२५ ऑक्टोबर : २५ ऑक्टोबरपासून राज्यनिहाय व्यापक जनजागरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
-
९ नोव्हेंबर : ९ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ या घोषणेखाली भव्य राष्ट्रीय महासभेचे आयोजन केले जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात आता ‘आर-पार’ची लढाई लढण्याचा निर्धार ‘इंडिया’ आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी व्यक्त केला आहे.
Read Also: जंतर-मंतरवर खळबळ! तीन महिला पत्रकारांचे पोलिसांवर गंभीर आरोप; निष्पक्ष चौकशीची मागणी










