Home महाराष्ट्र पोस्ट मृत्यूनंतरही वडिलांचा विराह असह्य! तब्बल ४ वर्षे फ्रीझरमध्ये ठेवला मृतदेह

मृत्यूनंतरही वडिलांचा विराह असह्य! तब्बल ४ वर्षे फ्रीझरमध्ये ठेवला मृतदेह


मुंबई: 
प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर होणारा विरह पचवणे अत्यंत कठीण असते; मात्र वडिलांच्या मृत्यूनंतरही त्यांना स्वतःपासून दूर जाऊ न देण्याचा एक अत्यंत अजब, धक्कादायक आणि तितकाच भावूक प्रकार मुंबईतील मालाड भागात समोर आला आहे
. जून २०२२ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झालेल्या आपल्या वडिलांचा मृतदेह कुटुंबियांनी तब्बल चार वर्षे मालाड (पूर्व) येथील एका बंद क्लिनिकमध्ये फ्रीजरमध्ये जतन करून ठेवला होता. अमेरिकेतील अत्याधुनिक ‘क्रायोनिक्स’ तंत्रज्ञानाच्या मदतीने वडिलांचे शरीर भविष्यासाठी सुरक्षित ठेवण्याचा आणि त्यांना पुन्हा जिवंत पाहण्याचा कुटुंबियांचा मानस होता.

दुर्गंधी आल्याने घटना उघडकीस आणि पोलिसांचा तपास

मालाड येथील हे ‘पॉलीक्लिनिक’ गेल्या महिनाभरापासून दुरुस्तीच्या कामामुळे पूर्णपणे बंद होते. याच काळात क्लिनिकमधून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील स्थानिक नागरिकांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी तात्काळ कुरार पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्लिनिकमधील फ्रीजर उघडला असता, त्यात जतन केलेला मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कुटुंबियांशी संपर्क साधला असता, त्यांनी २०२२ मध्येच वडिलांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे दर्शविणारी वैद्यकीय व कायदेशीर कागदपत्रे पोलिसांसमोर सादर केली. मयत व्यक्तीस एक मुलगा आणि एक मुलगी असून ते दोघेही अमेरिकेत स्थायिक आहेत. वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर बसलेल्या धक्कादायक आघातामुळे त्यांनी पारंपरिक अंत्यसंस्कार करण्याऐवजी अमेरिकेतील क्रायोनिक्स सेवा देणाऱ्या संस्थांशी संपर्क साधून शरीर जतन करण्याचा मार्ग निवडला होता.

 

हैही वाचा: आनंदाची सहल क्षणात शोकांतिका; दिवेआगर समुद्रात ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

‘क्रायोनिक्स’ तंत्रज्ञान, कायदेशीर बाबी आणि लाखो रुपयांचा खर्च

कायदेशीररीत्या मृत घोषित झालेल्या व्यक्तीचे शरीर किंवा मेंदू अत्यंत कमी तापमानात गोठवून जतन केले जाते, त्याला ‘क्रायोनिक्स’ तंत्रज्ञान असे म्हणतात. भविष्यात वैद्यकीय आणि वैज्ञानिक तंत्रज्ञान इतके प्रगत होईल की, या गोठवलेल्या शरीरातील आजार बरे करून संबंधित व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, या एकाच आशेवर ही गुंतागुंतीची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेसाठी आणि मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी कुटुंबिय संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थेला दर महिन्याला सुमारे १.६० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजत होते. याशिवाय, या संपूर्ण प्रक्रियेत कोणत्या कायदेशीर बाबी आणि अडचणी येऊ शकतात, हे समजून घेण्यासाठी कुटुंबियांनी नामांकित वकिलांचाही सल्ला घेतल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

वैद्यकीय व सामाजिक वर्तुळात उलट-सुलट चर्चा


या अनोख्या आणि विचित्र प्रकरणामुळे आता वैद्यकीय, कायदेशीर आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे
. भारतात अशा प्रकारे मानवी मृतदेह वैयक्तिक पातळीवर दीर्घकाळ जतन करून ठेवण्याबाबत स्पष्ट कायदेशीर नियमावली नसल्यामुळे, या घटनेने प्रशासकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विज्ञानावरील अतीव विश्वास आणि वडिलांप्रती असलेले अथांग प्रेम यातील नाजूक सीमारेषा या घटनेने स्पष्टपणे अधोरेखित केली आहे.

विद्युत शवदाहिनीमध्ये अत्यंत जड अंतःकरणाने अखेरचा निरोप

घटनेचा संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर आणि पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेची माहिती दिल्यानंतर, कुटुंबियांनी अखेर परिस्थितीचे गांभीर्य स्वीकारले. बुधवारी कुटुंबियांनी अत्यंत जड अंतःकरणाने आणि अश्रूभरल्या डोळ्यांनी विद्युत शवदाहिनीमध्ये आपल्या वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत त्यांना अखेरचा निरोप दिला. मृत्यूनंतरही वडिलांना आपल्याजवळ ठेवण्यासाठी मुलांनी गेल्या चार वर्षांपासून चालवलेली धडपड पाहून तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. अखेर चार वर्षांच्या या भावूक, विज्ञानाधारित पण दुर्दैवी प्रयत्नांचा अंत एका अत्यंत वेदनादायी वास्तवात झाला.

हेही वाचा: आधार कार्ड असेल तरच मालमत्ता खरेदी-विक्री! १ ऑक्टोबरपासून कडक नियम; ६३ प्रकारच्या फसवणुकीला बसणार आळा