भातकुली / धारणी: अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील गौराबाई गुढे प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेळघाटातील ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनी प्रिया गणेश मावसकर हिचा अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. प्रिया ही इयत्ता पाचवीमध्ये शिकत असून, ती धारणी तालुक्यातील राणीगाव येथील रहिवासी होती. तिच्या या आकस्मिक आणि धक्कादायक मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात आणि शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी येथे सादर करण्यात आलेल्या अधिकृत अहवालानुसार, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रियाला अचानक पाय आणि पोट दुखण्याचा तीव्र त्रास सुरू झाला. आश्रमशाळा प्रशासनाने तातडीने पावले उचलत तिला भातकुली येथील डॉ. काडवे यांच्याकडे उपचारासाठी नेले. मात्र, तिची हृदयगती अत्यंत तीव्र असल्याने पुढील उपचारासाठी तिला अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे रात्री ९:३० वाजता करण्यात आलेल्या २-डी इको तपासणीत तिला तीव्र हृदयविकार असल्याचे निदान डॉक्टर रोहन बोंबडे यांनी केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:४५ वाजता तिची प्राणज्योत मालवली.
दोन लाखांच्या धनादेशांचे गौडबंगाल आणि संताप
प्रियाच्या मृत्यूनंतर स्थानिक पातळीवर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. तिला शासकीय रुग्णालयात न नेता थेट खाजगी रुग्णालयात का नेण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच, मृत्यूनंतर संबंधित अनुदानित आश्रमशाळा संस्थेकडून एक लाख आणि प्रकल्प विभागाकडून एक लाख, असे एकूण दोन लाखांचे धनादेश मृत विद्यार्थिनीच्या आई-वडिलांना तातडीने देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाची किंमत लावली जात आहे का, असा संतप्त सवाल आदिवासी बांधवांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रकल्प अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल व चौकशीचे आदेश
या संपूर्ण प्रकरणाची धारणी येथील प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी सखोल चौकशीसाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या समितीला सात दिवसांच्या आत सविस्तर चौकशी करून आपला अहवाल सादर करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. या अहवालानंतरच विद्यार्थिनीच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल आणि आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब होईल. सध्या मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला असून, पालकांनी पोस्टमॉर्टम करण्याबाबत लेखी निवेदन दिले असल्याचे अहवालात नमूद आहे.
स्थानिक संघटना आणि पालकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा
या दुर्दैवी घटनेमुळे मेळघाटातील आदिवासी पालकांमध्ये आणि स्थानिक सामाजिक संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे आणि सुरक्षेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने स्थापन केलेल्या चौकशी समितीने सात दिवसांत निष्पक्षपणे तपास न केल्यास आणि दोषींवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक आदिवासी संघटनांनी दिला आहे. तसेच, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सर्व आश्रमशाळांमध्ये चोवीस तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.