Home City post ‘छात्रों की गूंज’चा नागपुरात आवाज; सप्टेंबरअखेरीस कार्यक्रमाची शक्यता

‘छात्रों की गूंज’चा नागपुरात आवाज; सप्टेंबरअखेरीस कार्यक्रमाची शक्यता

नागपूर : पुण्यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचा आवाज नागपुरातही घुमण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन नागपुरात करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हा कार्यक्रम होण्याची शक्यता असून, कार्यक्रमाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.‘छात्रों की गूंज’ या अभियानाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थी आणि युवकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली जात आहे. शिक्षणव्यवस्था, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे हक्क, परीक्षा, शैक्षणिक सुविधा आणि युवकांच्या भविष्यासंदर्भातील मुद्द्यांवर या अभियानातून चर्चा केली जात आहे. राहुल गांधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेणार असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यात २२ ऑगस्ट रोजी राहुल गांधी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी आले होते. एसएसपीएमएस प्रशालेच्या मैदानाजवळ दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आयोजकांना अनेक अटी घातल्या होत्या. कार्यक्रमस्थळी आक्षेपार्ह फलक, चित्रे किंवा धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा, प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी पुरेसे मार्ग, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, अग्निशामक यंत्रणा आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पोलिसांनी केल्या होत्या.दरम्यान, पुण्यातील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकारच्या शिक्षणव्यवस्थेवर जोरदार टीका केली होती. ‘न पढे है, न पढने देंगे’ अशीच भाजप सरकारची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील शाळा का बंद होत आहेत, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक का मिळत नाहीत, असे सवालही त्यांनी उपस्थित केले होते.याच पार्श्वभूमीवर आता नागपुरातील संभाव्य ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नागपुरातील विद्यार्थी आणि युवक या कार्यक्रमाला किती प्रतिसाद देतात, तसेच राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर नेमकी काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान, ‘छात्रों की गूंज’चा नागपुरातील कार्यक्रम सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कार्यक्रमाचे ठिकाण, वेळ आणि अधिकृत तारीख याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे राहुल गांधींच्या संभाव्य नागपूर दौऱ्याकडे विद्यार्थी, युवक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.