Home City post राहुल गांधींचा पुणे दौरा चर्चेत; ‘छात्रों की गूंज’

राहुल गांधींचा पुणे दौरा चर्चेत; ‘छात्रों की गूंज’

पुणे :   काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवार, २२ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर असून,  छात्रों की गूंज या कार्यक्रमातून ते युवकांशी संवाद साधणार आहेत.  पोलिसांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी ३० अटी घातल्या असून, कार्यक्रमस्थळी आक्षेपार्ह फलक, चित्रे तसेच धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसएसपीएमएस प्रशालेच्या मैदानाजवळ दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊ या वेळेत राहुल गांधी यांचा कार्यक्रम होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वंदे मातरम् कृती समितीकडून  युवा की आवाज हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी पाच वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आला आहे. युवकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासोबतच राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा, प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी पुरेसे मार्ग, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, अग्निशामक यंत्रणा आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्याची अट पोलिसांनी घातली आहे. तसेच खासगी सुरक्षारक्षक तैनात करावेत आणि महिला सुरक्षारक्षक कार्यक्रमस्थळी ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे.कार्यक्रमस्थळी महिला स्वयंसेवकांनी उपस्थित राहावे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळी आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक असून, आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची वाहने आणि रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

न पढे है, न पढने देंगे :
दरम्यान, काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी देशातील शिक्षणव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. न पढे है, न पढने देंगे हीच भाजप सरकारची भूमिका असून, शिक्षणाचा मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शाळेत शिकवण्यासाठी चांगले शिक्षक उपलब्ध नाहीत आणि आपण विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहत आहोत, अशी टीकाही त्यांनी केली . कन्हैया कुमार यांनी देशातील शाळा का बंद होत आहेत, यावर सरकार बोलत नसल्याचे म्हटले. तसेच देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून मोठमोठी भाषणे करतात  मात्र देशभरातील शाळा का बंद होत आहेत, यावर बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याची आणि ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची राजकीय वातावरणात चर्चा आहे.