नागपूरमधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वस्तीगृहातील एका विद्यार्थिनीने हॉस्टेलमधील असुविधांविरोधात आवाज उठवला. मात्र, तक्रार केल्यानंतर आता तिलाच हॉस्टेल सोडण्याची नोटीस देण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थिनींमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून नागपुरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. आकांक्षा प्रकाश उके ही M.B.A प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असून ती या शासकीय वस्तीगृहात राहत आहे. मागील काही दिवसांपासून नागपुरात उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढत्या उकाड्याचा सर्वाधिक फटका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना बसत असल्याचं सांगितलं जात आहे.विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, वस्तीगृहात कुलरची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे रात्री झोपणंही कठीण झालं होतं.
अनेक मुलींना उष्णतेमुळे त्रास होऊ लागला. काही मुलींच्या अंगावर इन्फेक्शन आणि घामोळ्यांसारख्या समस्या निर्माण झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, हॉस्टेलच्या नियमांमुळे विद्यार्थिनींना स्वतःचा कुलर आणण्याची परवानगीही नव्हती. त्यामुळे विद्यार्थिनींना तीव्र उकाड्यातच दिवस काढावे लागत होते.मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेतल्यानंतर संबंधित प्रशासनाला तातडीने कुलरची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर हॉस्टेलमध्ये कुलर बसवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.मात्र, या प्रकरणानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे. तक्रार केल्याचा राग मनात ठेवून हॉस्टेल प्रशासनाने आकांक्षा उके हिलाच लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाकडून तिला हॉस्टेल सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.“तू बाहेर नोकरी करतेस,” हे कारण देत तिला वस्तीगृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थिनीकडून सहा महिन्यांचे हॉस्टेल भाडे आणि जेवणाचा खर्चही वसूल केला जाणार असल्याचं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे “मुलींसाठी मूलभूत सुविधा मागणं हा गुन्हा आहे का?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.एका विद्यार्थिनीने केवळ मुलींच्या आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी आवाज उठवला. मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेतली. मात्र, त्यानंतर तिच्यावरच कारवाई होत असल्याचा आरोप आता चर्चेचा विषय ठरत आहे.या प्रकरणात प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे, नोटीस कोणत्या कारणावरून देण्यात आली आणि विद्यार्थिनीला न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.










