पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी बनावट दारूमुळे मोठी दुर्घटना घडली असून आतापर्यंत १७ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फुगेवाडी, दापोडी, हडपसर, काळेपडळ आणि पांढरे मळा परिसरात या घटनेमुळे भीती आणि शोककळा पसरली आहे. अनेक नागरिकांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, अवैध हातभट्टीची विषारी दारू प्यायल्यामुळे हे मृत्यू झाले आहेत. मृत व्यक्तींना तोंडाला फेस येणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दृष्ट कमी होणे आणि अवयव निकामी होण्यासारखी गंभीर लक्षणे दिसून आली होती.
काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.प्राथमिक तपासात या दारूमध्ये मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन मिसळल्याचे समोर आले आहे. मिथेनॉल हे बनावट आणि निकृष्ट दारूमध्ये सर्रास वापरले जाणारे धोकादायक रसायन मानले जाते. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने ही विषारी दारू तयार करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पुरवठा केल्याचा आरोप आहे.
विषारी दारूमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
त्याच्यावर यापूर्वीही अवैध दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून आणखी काही आरोपींनाही ताब्यात घेतले आहे.दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. परिसरात अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू होती, मात्र वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संपूर्ण साखळी शोधून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. “ही एक प्रकारची हत्याच आहे.अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.










