Home City post वीज चोरी करणाऱ्यांनो सावधान…. स्मार्ट मीटर मधील यंत्रणा महावितरणला देईल अलर्ट

वीज चोरी करणाऱ्यांनो सावधान…. स्मार्ट मीटर मधील यंत्रणा महावितरणला देईल अलर्ट

नागपूर : भारत देश हा असा देश आहे, जिथे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन या देशातील लोक काढतातच, मग ते लीगल असो वा इल्लिगल. मात्र आता इल्लिगली जर तुम्ही जुगाडू पद्धतीने वीज चोरी कराल, तर नक्कीच पकडले जाल. सध्या स्मार्ट मीटर चर्चेत आहे. सरकार हे स्मार्ट मीटर प्रत्येक घरात लागावं यासाठी जोरजबरदस्ती करत आहे. पण नागरिकांचा या स्मार्ट मीटरला घेऊन संताप सुटला आहे. आणि याच स्मार्ट मीटरच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलन झाले असून, अनेक ग्रामपंचायतींनी हे स्मार्ट मीटर स्वीकारण्यास नकार दिला आहे.

तरीही सरकारनं ही स्मार्ट मीटर मोहीम घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करून अनेक भागात हे मीटर बसवले आहेत. पण लोकांना हे स्मार्ट मीटर नको आहेत, त्यामुळे ते त्या मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करत आहेत. तर, हे वीज चोरी करणं आताच थांबवा, कारण जर तुम्ही वीज चोरी कराल तर तुमच्यावर दंड देखील लागू शकतो.

वीजचोरी कराल तर महावितरणला लगेच मिळेल माहिती

वीज चोरीला आळा घालण्यासाठी आणि वीज व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी महावितरणने घरोघरी अत्याधुनिक (टीओडी) म्हणजे टाइम ऑफ डे मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे. हे मीटर ग्राहकांसाठी आणि महावितरणसाठी दोघांसाठीही फायदेशीर आहे. मात्र असे असूनही काही महाभागांनी या स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार राज्याच्या काही भागात झाले आहेत. पण त्यांना हे माहित नाही की या मीटरमधील यंत्रणा इतकी आधुनिक आहे की चोरीचा प्रयत्न होताच महावितरणला त्याची माहिती लगेच मिळते आणि वीज चोरांना पकडता येते. कारण (टीओडी) मीटरमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास, जसे की मीटर उलटे लावणे, वायरमध्ये फेरफार करणे किंवा मॅग्नेटचा वापर करणे या सर्व घटनांची नोंद मीटरमधील सेन्सरद्वारे होते. आणि ही माहिती तात्काळ महावितरणच्या सेंट्रल सर्व्हरला पाठवली जाते. सर्व्हरवर हे अलर्ट लगेच दिसतात, त्यामुळे महावितरणचे अधिकारी तात्काळ त्या जागेची तपासणी करून वीजचोरांना पकडू शकतात. या यंत्रणेमुळे आता वीज चोरी करणं जवळजवळ अशक्य झालं आहे.

या मीटरची वैशिष्ट्ये काय?
१) टीओडी मीटर ग्राहकाच्या वीज वापराची माहिती रिअल टाइममध्ये रेकॉर्ड करतात.
२) दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वापरलेल्या विजेनुसार दर आकारला जातो.
३) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरल्यास ग्राहकांना प्रती युनिट ८० पैशांची सवलत मिळते. आणि ही सवलत येत्या ५ वर्षांत टप्प्याटप्प्याने १ रुपयापर्यंत मिळणार आहे.
४) हे मीटर महावितरणच्या सर्व्हरशी दोनमार्गी संवाद साधतात. ज्यामुळे वीज वापर आणि मीटरची स्थिती यांची माहिती उपलब्ध होते.
५) मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार किंवा छेडछाड केल्यास त्याची माहिती लगेच सर्व्हरला कळते.

चोरी केल्यास काय दंड?
वीज चोरी करताना पकडले गेल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ व १३८ नुसार कठोर कार्यवाही केली जाणार आहे. यामध्ये वीजचोराला चोरी केलेल्या विजेचा दंड, तडजोड शुल्क आणि त्यासोबतच गुन्हा सिद्ध झाल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. हा दंड वीज वापराच्या आधारावर निश्चित केला जातो आणि तो खूप मोठा असू शकतो.