Home City post चिमुकल्याचा गळा आवळून जीव घेतला; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला

चिमुकल्याचा गळा आवळून जीव घेतला; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला

नागपूर : जर तुम्हाला लॉटरी लागणार आहे आणि तुम्ही मालामाल होणार आहात. पण तुमच्याकडे पैसे येणार आहेत, याची भनक तुमच्या जवळच्या मित्राला आहे. आणि तो मित्र तुमचा अगदी जवळचा असून तुम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की, त्या मित्राचा डोळा तुमच्या पैशावर कधीच जाणार नाही. पण अचानक तुम्हाला कळते की तोच मित्र तुम्हाला ब्लॅकमेल करणार आहे आणि तुमच्या मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करणार आहे, तर मग तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार? हा खरोखर मोठा प्रश्न आहे, नाही का?

ही घटना आहे नागपूर जिल्यातील सावनेर तालुक्यातील खापरखेडा गावातील. जितू युवराज सोनकर नावाचा सहावीत शिकणारा मुलगा आईसोबत राहत होता. त्याचे आई-वडील वेगळे राहत होते. आई खापरखेड्यात तर वडील चणकापूर येथे राहत होते. जितू आईकडे राहत असला तरी त्याला वडिलांकडे राहायचे होते. त्याचे वडील भाजीपाला विकायचे आणि पांढुर्णा (मध्यप्रदेश) येथे त्यांची शेती होती. त्या शेतीच्या व्यवहारातून त्यांना मोठी रक्कम मिळणार होती. ही माहिती जितूच्या वडिलांचा मित्र राहुल याला होती. राहुल आणि त्याचे दोन मित्र हेही जितूच्या वडिलांचेच परिचित होते.

वडिलांचा मित्रानी घेतला जीव 

याच लोभातून राहुलने आपल्या दोन मित्रांसह जितूचं अपहरण करून त्याच्या वडिलांकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागण्याची योजना आखली. सोमवारी संध्याकाळी जितू शाळा सुटल्यावर घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. बुधवारी सकाळी चणकापूर येथील वेकोलि कॉलनीलगतच्या झुडपात बकऱ्या चारणाऱ्याला जितूचा मृतदेह आढळला. डोके आणि डोळ्यावरील गंभीर जखमांमुळे त्याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. जितू रोज शाळेत बसने यायचा-जायचा आणि त्याच्याकडे बस पासही होता. पण त्या दिवशी तो पायी निघाला आणि आरोपी राहुलसोबत कारमध्ये बसला. कारण जितू राहुलला ओळखत होता. त्याला वडिलांकडे जायचं होतं. कारमध्ये बसताना त्याच्या तीन मित्रांनीही त्याला पाहिलं होतं. त्यामुळे जितूची आई थेट राहुलवर संशय घेतला. राहुल पोलिसांच्या चौकशीत सापडला आणि अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

गळा आवळून केली हत्या

या कारमध्ये राहुल पाल, यश वर्मा आणि अरुण भारती हे तिघे होते. तिघेही चणकापूर, ता. सावनेर येथील रहिवासी आहेत. त्यांनी जितूला अन्नामोड, कोराडी मंदिर रोड, वारेगाव, भानेगाव, बिना संगममार्गे पारशिवनीकडे नेलं. त्यानंतर पुन्हा पोटा, चणकापूरच्या दिशेने आणलं. रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास कारमध्ये जितू चिडचिड करत होता. तेव्हा त्यांनी त्याचा गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरला. राहुलने वेकोलिच्या चणकापूर येथील एका रिकाम्या क्वार्टरवर अवैधरित्या कब्जा केला होता. तिथेच मृतदेह ठेवला. पण दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी मृतदेह झुडपात फेकला आणि पोते रेतीच्या ढिगाऱ्यात लपवले.

सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पोलिसांनी त्यांच्याकडून कार, क्वार्टरमधून स्कूल बॅग आणि रेतीच्या ढिगाऱ्यातून पोते जप्त केले आहे. या घटनेमुळे खापरखेडा-चणकापूर परिसरात प्रचंड भीती आणि चिंता निर्माण झाली असून लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिला आहे — विश्वास करायचा तरी कोणावर? आणि करायचाच कसा?