मुंबई : महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार रतन टाटा यांच्या नावाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे उद्योग भूषण पुरस्काराचे नाव बदलून रतन टाटा यांच्या नावानेच हा पुरस्कार यापुढे देण्यात येणार आहे. महाराष्ट्र उद्योग भवनाला देखील त्यांचे नाव देण्यात येणार आहे. तसेच, पहिला उद्योग भूषण पुरस्कार हा रतन टाटा यांनाच मिळालेला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना त्यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा देखील प्रस्ताव पारित केला आहे. हा प्रस्ताव आता पुढील कारवाईसाठी केंद्राकडे पाठवला जाणार असून मुंबईत उभारण्यात येणाऱ्या उद्योग भवनाला देखील रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अत्यंत महत्वाचा निर्णय!
ज्या उद्योग भूषण पुरस्काराने रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले होते, त्या पुरस्काराचे नाव बदलून आता हा पुरस्कार रतन टाटा यांच्या नावाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अत्यंत महत्वाचा निर्णय ठरणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी एक शोकप्रस्ताव सादर केला. यावेळी पद्मविभूषण रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची भारत सरकारला विनंती करणारा एक प्रस्तावही संमत करण्यात आला.
उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती काय?
महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचे नाव देणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून याबाबतची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यांनीच याबाबतची घोषणा देखील केली असल्याचे समजते. पुढील वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
रतन टाटा यांचे काम कायमस्वरुपी लोकांच्या लक्षात राहायला हवे!
रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार हा महाराष्ट्रामार्फत दिला जाणार आहे. तसेच नरिमन पॉईंट येथे फार मोठे उद्योग भवन उभे करण्यात येत आहे. त्याची रचनाही वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. त्याची उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या उद्योग भवनाला रतन टाटांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन त्यांची स्मृती आणि त्यांचे काम कायमस्वरुपी लोकांच्या लक्षात राहायला हवे, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.










