Home City post एमपीएससीविरोधात आज नागपुरात आक्रोश मोर्चा; पेपरफुटीच्या चौकशीची मागणी

एमपीएससीविरोधात आज नागपुरात आक्रोश मोर्चा; पेपरफुटीच्या चौकशीची मागणी

औषध निरीक्षक परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणासह २०२२ पासूनच्या परीक्षांची चौकशी करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने बुधवारी नागपुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान चौकात सकाळी १० वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

औषध निरीक्षक परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणासह २०२२ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे. विशेषतः प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते तिची छपाई, सुरक्षित हाताळणी, वाहतूक आणि परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचविण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

समितीच्या मते, प्रश्नपत्रिका फुटीच्या कथित प्रकरणामुळे आयोगाच्या गोपनीय आणि परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ एका परीक्षेपुरती चौकशी मर्यादित न ठेवता कृषी सेवा परीक्षेसह २०२२ पासून आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या प्रक्रियेचीही तपासणी करण्यात यावी.

अध्यक्ष, सचिवांना पदमुक्त करण्याची मागणी

चौकशी पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव महेंद्र हरपळकर यांना पदमुक्त करावे, अशी मागणीही विदर्भ स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून परीक्षा केंद्रापर्यंत तिची गोपनीयता आणि सुरक्षितता कायम राहते की नाही, याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्याची गरज असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

दरम्यान, पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना यूपीएससी, नीट, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप केला. तसेच पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे त्यांनी म्हटले.

राऊत यांनी लोकसेवा आयोग बरखास्त करून सर्वसमावेशक पद्धतीने परीक्षा प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात आली असली तरी एका यंत्रणेवर दुसरी यंत्रणा लादण्यापेक्षा परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या आक्रोश मोर्चाकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. पेपरफुटीप्रकरणी पारदर्शक चौकशी, परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीने केली आहे. आंदोलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अभिलाष वऱ्हाडे, अतुल खोब्रागडे आणि संजय रणदिवे यांनी केले आहे.