मुंबई : भोंदूबाबा खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे पडसाद आता थेट राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे.
पक्षाची नाराजी स्पष्ट; पाठबळ नसल्याने चाकणकर पायउतार
रूपाली चाकणकर यांचे नाव भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासोबत जोडले गेल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित काही फोटो आणि संबंधांची चर्चा समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पक्षातील नेत्यानी सुद्धा या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक जीवनात आपण कोणाबरोबर वावरलं पाहिजे याचे भान ठेवले पाहिजे. आपल्याविषयी संशय येणे कथीही योग्य नसते. समोर आलेल्या प्रकरणात संबंधितांवर पक्ष नक्कीच कारवाई करेल, असे सांगत पटेल यांनी चाकणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदावरुन गच्छंती असल्याचे स्पष्ट केले. एकीकडे विरोधकांनी केलेले लक्ष्य आणि आपल्याच पक्षात कोणीही पाठराखण न केल्याचे चित्र चाकणकर यांच्या सोबत शुक्रवारी स्पष्ट झाले.
चौकशीची मागणी; सत्य बाहेर येणार का?
भोंदुबाबा खरातवर महिला अत्याचाराचे अनेक आरोप आहेत. त्यातच चाकणकर यांचे खरातशी जवळचे संबंध आहेत. आणि तरीही चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणे अजिबात योग्य होणार नाही, अशी भावना भाजपाकडूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळवण्यात आले असे समजते. दरम्यान वाद अधिक तीव्र होत असतानाच चाकणकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांची भेट घेत या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, व्हायरल झालेल्या छायाचित्रांची सत्यता पडताळून पाहावी आणि या प्रकरणामागील सत्य जनतेसमोर यावे अशी मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ एक राजीनामा म्हणून न पाहता सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीबाबत किती जबाबदारीने वागावे याचा हा मोठा धडा मानला जात असून, पुढील चौकशीतून आणखी कोणती माहिती समोर येते आणि या प्रकरणात आणखी कोणत्या व्यक्तींची नावे उघड होतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.










