नागपुर : मध्यरात्री एका तरुणाने घरात घुसून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव अमित सोनटक्के (खामला) असे आहे.
काय होत प्रकरन?
अल्पवयीन मुलीशी आरोपीची जुनी ओळख असून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करतो. काही काळापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. त्याने धमकी दिल्याने मुलीने राणाप्रताप नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर दोघांमधील बोलणे बंद झाले होते.
मात्र, १० सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजता अमित तलवार घेऊन मुलीच्या आजीच्या घरी पोहोचला. त्याने तलवारीच्या धाकावर तिच्या आजीला धमकी दिली व घरात शिरला. त्यानंतर त्याने मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरला. मुलीने विरोध केल्यावर त्याने तिचा गळा दाबला व जीव घेण्याचा प्रयत्न केला.
आरोपीला झाली अटक
त्याने तिच्या मानेवर तलवार ठेऊन धमकीदेखील दिली. त्यानंतर त्याने तिला जबरदस्तीने घेऊन पळ काढला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून अमितला ताब्यात घेतले व मुलीची सुटका केली. अखेर आरोपीला अटक करण्यात आली आहे.









