नागपूर : कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काही तरी कौशल्य असावे या हेतूने व कारागृहाचे ध्येय सुधारणा व पुनर्वसन या दृष्टीकोणातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच कारागृहात शिक्षा भोगत असतांना बंद्यांचे कौशल्य समाजापुढे यावे या उद्देशाने बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री तसेच दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. अशातच, दिवाळी सणानिमित्य नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयानी तयार केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा उद्घाटन सोहळा आज सकाळी 10 वाजता पार पडला.
दरम्यान, या माध्यमातून जेलमधील कैद्यांनी दिवाळी निमित्त तयार केलेल्या काही खास वस्तूंचा मेळावा भरवण्यात आला होता. तसेच, या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. डॉ. भुषणकुमार उपाध्याय, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जेल हे ठिकाण केवळ कैद्यांच्या शिक्षा भोगण्यासाठी ठिकाण नसून जेल म्हणजे कैद्यांची सुधारणा आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी असलेले ठिकाण असते. त्यामुळेच सुधारणा व पुनर्वसन हे या कारागृहविभागाचे ब्रिद वाक्य आहे.
दिवाळी सणानिमित्य खास रंगीबेरंगी वस्तूंची विक्री कुठे?
या विक्री केंद्रामार्फत विविध वस्तु दिवाळी सणानिमित्य खास रंगीबेरंगी पणत्या, आकाश कंदील, हातमाग साडया, लाकडी खुर्च्या, टी-टेबल, फोल्डींग स्टुल, चौरंग, ज्वेलरी बॉक्स इ. तसेच लोखंडी वस्तु, शोपिस, दऱ्या, आसनपट्टी, कपडे, टॉवेल इ. वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वस्तु विक्री करीता नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, वर्धा रोड, रहाटे कॉलनी, मेट्रो स्टेशनच्या बाजुला, कारागृह परीसर, नागपूर या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. हे केंद्र नागरीकांसाठी दररोज सकाळी 9.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत सुरु राहील. तसेच, आपण देखील एक समाजाचा घटक आहोत. आपण देखील समाजाचे काही देणे लागतो. या भावनेने समाजाविषयी कृतज्ञतेची भावना ठेवण्याच्या दृष्टीने कारागृहातील महिला व पुरुष बंदी बांधवांनी बनविलेल्या अत्यंत सुबक व कलाकुसरीच्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री दिवाळी सणाचे माध्यमातुन करण्यात येत असल्याचे समजते.
मा. श्री. डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांचे मार्गदर्शन काय?
मा. श्री. डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदावर काम केले आहे. आज त्यांच्या प्रेरणेमधुन कारागृह विभागात लहान मुलांना गळाभेट कार्यक्रमाची सुरवात झाली. तसेच, त्यांच्या प्रेरणेमधुन बंदयांसाठी कारागृहात योगा, प्राणायम, तनाव मुक्ती इ. विविध उपक्रम सुरु झालेत. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, दिवाळी मेळाव्याद्वारे आमचे बंदी बांधव या माध्यमातुन एक संदेश देवू ईच्छीतात की, आज जरी आम्ही या दिवाळीच्या सणाला आमच्या कुटुंबीयांपासुन दुर असलो तरी, आम्ही बनविलेल्या या वस्तुच्या माध्यमातुन अनेकांच्या घरात दिवाळी साजरी होणार आहे. हीच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे. आपण सर्वांनी आमच्या दिवाळी मेळाव्याला भेट देवून कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणीत करावा, असे ते म्हणाले. तसेच, या उपक्रमांची दखल देशस्तरावर सर्व राज्यांनी घेतली आहे. सदर कार्यक्रमामध्ये वऱ्हाड संस्था अमरावती यांचे मार्फत कारागृहातील बंदयांच्या शिक्षण घेणाऱ्या गरजवंत अशा मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आला. इतकेच नाही तर, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य व श्री. वैभव सु.आगे, अधीक्षक, नागपूर मध्यवर्ती कारागृह, यांचे हस्ते कारागृहातील बंदयांच्या 23 लहान मुलांना शैक्षणिक साहित्य स्कुलकीट चे वाटपही केले. यासोबतच त्यांनी उपस्थीत बंदयांच्या मुलांना शिक्षणात प्रगती करण्याचे शुभ आशिर्वादही दिले.
बंदयांना विविध प्रकारचे प्रशिक्षण!
कारागृह उद्योगात बंदयांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर शोभेच्या वस्तू या सामान्य नागरीकांना विक्रिकरीता रक्षाबंधन, दसरा व दिवाळी या सनानिनिमित्य उपलब्ध करुन देण्यात येतात. यावर्षी सुध्दा मा. प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे प्रेरणेतुन व मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पूर्व विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली कारागृहात बंदयांनी तयार केलेल्या वस्तु समाजातील लोकांपर्यंत पोहचाव्यात व बंदयांना देखील कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने बंदयांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांचेकडुन आकर्षक वस्तुंचे उत्पादन कारागृहात करण्यात आले. कारागृहामध्ये लोहारकाम, विणकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम, महीला विभाग हातमाग इ. प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. दरम्यान, कारागृहातील या उद्योगामध्ये बंदयांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार देण्यात येतो. तसेच बंदयांनी सदर विभागात काम केल्यावर केलेल्या कामाचे त्यांना वेतन देण्यात येते.