मुंबई : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची खूप चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रूपये जमा होत आहेत. आतापर्यंत या योजनेत करोडो महिलांनी नोंदणी केली आहे. मात्र या नोंदणीपैकी अनेकांचे अर्ज रद्द ठरलेत, तर अनेकांनी अद्याप कागदपत्राअभावी फॉर्मच भरले नाही. त्यामुळे या महिलांना आता सप्टेंबरमध्ये पुन्हा अर्ज करण्याची संधी आहे. त्यात आता या योजनेत नेमक्या किती महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत? याचा आता नेमका आकडा समोर आला आहे.
दरम्यान, जुलैमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये पुण्यातील कार्यक्रमाद्वारे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज दाखल केले होते त्यांना १७ ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम खात्यात पाठवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज सादर केले त्यांना ३१ ऑगस्ट रोजी नागपूर येथील कार्यक्रमाद्वारे दोन महिन्यांची रक्कम देण्यात आली असे समजते.
आतापर्यंत लाडक्या बहिणींना ४७८७ कोटींचा लाभ!
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती दिलेली आहे. हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘त्या’ महिलांना ३००० मिळणार नाही!
राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र १ सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नसल्याचे समोर आले आहे. यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार असल्याचे समजते.
४५०० रुपये कोणाला येणार?
दरम्यान, ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण ३००० रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण ४५०० रुपये दिले जातील. मात्र त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे.










