अमरावती :अमरावती शहरातील फ्रेंझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर तिच्या नवजात बालकाची कथित विक्री करण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गरोदरपणापासून ते प्रसूतीपर्यंतच्या काळात संगनमत करून बालकाचा ३.५० लाख रुपयांत सौदा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी रविवारी सायंकाळी एका महिला डॉक्टरसह तिचा पती आणि संबंधित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा अशा तिघांविरुद्ध फ्रेंझरपुरा पोलीस ठाण्यात बलात्कार, पॉक्सो, गुन्हेगारी धमकी तसेच मानवी तस्करीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : अनिल पंडित कोण? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेला उधाण
प्रेमसंबंधातून गरोदरपण अन् रुग्णालयातील उपचार
एफआयआरनुसार, या प्रकरणातील १७ वर्षे ४ महिने वयाच्या पीडित अल्पवयीन मुलीचे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते, ज्यातून ती गरोदर राहिली. गरोदरपणाची कुणकुण लागताच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी येथील डॉ. वैशाली भोजने यांच्याकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करून बालकाच्या जन्मापर्यंतचे सर्व उपचार पार पाडले. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीने एका सुदृढ बालकाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.
अनाथालयाचे नाव सांगून साडेतीन लाखांत सौदा
प्रसूतीनंतर महिला डॉक्टर व तिच्या पतीने पीडित मुलीच्या वडिलांना बोलावून नवजात बाळ साडेतीन लाख रुपयांमध्ये विकण्याचा परस्पर कट रचला. हे बाळ अनाथालयात किंवा दत्तक संस्थेला देऊ, तुम्ही काळजी करू नका असे सांगून त्यांनी सुरुवातीला दिशाभूल केली. मात्र, बालकाच्या ताब्यावरून आणि संगोपनाबाबत संशय आल्याने पीडित मुलगी, तिची आई व वडिलांनी प्रसंगावधान राखत त्या नवजात बाळाला शनिवारी ताब्यात घेतले आणि ते कसेबसे रुग्णालयातून बाहेर पडले.
डॉक्टरांकडून बालकाचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय
या संपूर्ण प्रकरणाची माहिती उघड झाल्यानंतर, डॉक्टर आपल्या महिला रुग्णालयाच्या माध्यमातून नवजात बालकांचा अशा प्रकारे काळाबाजार करत असल्याचा तीव्र संशय बळावला आहे. अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव आणून नवजात बाळ बळकावण्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशा संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रालाही काळिमा फासला गेला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
पोलिसांकडून कसून तपास आणि आरोपींचा शोध
सध्या या प्रकरणाचा तपास फ्रेंझरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र राजुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत वेगाने सुरू असून, पोलीस या प्रकरणातील प्रत्येक धाग्याची कसून पडताळणी करत आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिचे नवजात बाळ सध्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या मानवी तस्करीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या मुख्य सूत्रधारांना लवकरच अटक केली जाईल आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: अरबी समुद्रात भारतीय यंत्रणांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक! ३ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, ५ पाकिस्तानी तस्करांना बेड्या