आंधळगाव: “माझी मुले उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांचे हप्ते भरायचे आहेत. दुसरा व्यवसाय नाही, काहीतरी करा साहेब; नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय नाही…” अशा शब्दांत डोळ्यांत पाणी आणून पालकमंत्र्यांपुढे याचना करणाऱ्या शेतकऱ्याने अखेर आत्महत्या केली आहे. मोहाडी तालुक्यातील धोप येथील राजेंद्र अंबर सपाटे (५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ३ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दुष्काळग्रस्त शेती पाहणीदरम्यान धोप येथे भेट दिली होती, जिथे सपाटे यांनी आपली व्यथा मांडली होती. मात्र, त्या भेटीनंतर अवघ्या चार दिवसांतच त्यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली, ज्यामुळे संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.
हेही वाचा: समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; सिंदीचे ७ भाविक ठार
प्रशासकीय दुर्लक्ष ठरले जीवघेणे
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पाहणीदरम्यान राजेंद्र सपाटे यांनी भरल्या कंठाने आपल्या अडचणी आणि शेतीच्या समस्या मांडल्या होत्या. यावर पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या समस्या नोंदवून घेण्याचे व लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही. प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य न मिळाल्याने आणि दुःखावेगात खचलेल्या सपाटे यांनी शेवटी हे टोकाचे पाऊल उचलले.
मागण्यांसाठी ग्रामस्थ झाले आक्रमक
घटनेची माहिती मिळताच कौटुंबिक आणि गावातील नागरिक अत्यंत आक्रमक झाले. पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि घरातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे लेखी आश्वासन मिळावे, या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिले. ही मागणी पूर्ण होईपर्यंत मृतदेह विहिरीबाहेर काढू न देण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. पालकमंत्र्यांचे आश्वासन आणि तहसीलदारांच्या पत्रानंतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
घटना दुर्दैवी आणि धक्कादायक: पालकमंत्री
या घटनेवर बोलताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी, गंभीर आणि धक्कादायक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दौऱ्यादरम्यान भेट झाल्यानंतर त्यांनी प्रकरणाची माहिती घेण्यासाठी मध्यस्थ आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून योजनेनुसार बाधित कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कोणत्याही शेतकऱ्याने असा निर्णय घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह
या दुःखद घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर आणि दुर्लक्षावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पालकमंत्र्यांनी स्वतः आदेश देऊनही जर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच चक्रे हलवली असती, तर कदाचित या शेतकऱ्याचा जीव वाचू शकला असता, अशी चर्चा आता परिसरात सुरू आहे. केवळ आदेश देणे आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न होणे, या प्रशासकीय दिरंगाईमुळेच एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
परिसरात तीव्र शोककळा आणि मदतीची मागणी
राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने धोप आणि लगतच्या सर्वच गावांमध्ये शोककळा पसरली आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. शासनाने केवळ आश्वासने न देता पीडित कुटुंबाला तात्काळ भरीव आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी, अशी जोरदार मागणी आबालवृद्धांकडून केली जात आहे.
हेही वाचा: मृत्यूनंतरही वडिलांचा विराह असह्य! तब्बल ४ वर्षे फ्रीझरमध्ये ठेवला मृतदेह










