देवरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरीच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध योजना, सेवा आणि सुविधांचा थेट लाभ मिळवून देणे, नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करणे तसेच शासकीय योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन आणि आदिवासी नागरिकांमधील संपर्क अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे.
श्री नितीन इसोकर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग, देवरी
देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालयासह गोंदिया जिल्ह्यातील ११ आदिवासी आश्रमशाळांमध्ये अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम, शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देतानाच पात्र लाभार्थ्यांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वन हक्क अधिनियमांतर्गत अतिक्रमणधारकांना ७/१२ उतारे आणि हक्क प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार असून, आदिवासी नागरिकांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांसाठी क्रीडा उपक्रम
अभियानांतर्गत राणी दुर्गावती आदिवासी महिला बचत गटांची स्थापना करण्यात येणार असून, महिला सक्षमीकरण मेळाव्याचेही आयोजन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘फिट इंडिया’अंतर्गत क्रीडा सत्र घेण्यात येणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमधील कला आणि विविध गुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान तसेच ग्रामसभांचे आयोजन करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आधार कार्डपासून योजनांच्या साहित्य वाटपापर्यंत उपक्रम
अभियानाच्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांना आधार कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. गावागावांत ‘पेसा मोबिलायझर’च्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या साहित्याचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांची तपासणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘सेवा, समर्पण, संवेदनशीलता’चा संदेश
‘सेवा, समर्पण, संवेदनशीलता’ या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा जास्तीत जास्त आदिवासी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी केले आहे. शासनाच्या विविध योजना आणि सुविधांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे.