Home एंटरटेनमेंट पोस्ट २० वर्षांच्या प्रेमाचा खास ‘सीक्वेल’! सूर्या-ज्योतिकाने मुलांसमोर पुन्हा केलं लग्न; जिनिलिया देशमुखची...

२० वर्षांच्या प्रेमाचा खास ‘सीक्वेल’! सूर्या-ज्योतिकाने मुलांसमोर पुन्हा केलं लग्न; जिनिलिया देशमुखची खास कमेंट चर्चेत

दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक असलेल्या सूर्या आणि ज्योतिका यांच्या लग्नाला तब्बल २० वर्षे पूर्ण झाली आहेत. ऑनस्क्रीन सुरू झालेली त्यांची ओळख पुढे खऱ्या आयुष्यातील प्रेमसंबंधात बदलली आणि दोघांनी विवाहबंधनात अडकत आयुष्याची नवी सुरुवात केली. गेल्या दोन दशकांपासून सुख-दुःख, चढ-उतार आणि आयुष्यातील अनेक प्रसंगांना सामोरं जात दोघांनी एकमेकांना साथ दिली आहे. आपल्या लग्नाच्या २०व्या वाढदिवसानिमित्त या जोडप्याने हा खास टप्पा अतिशय अनोख्या आणि भावनिक पद्धतीने साजरा केला. दोघांनी चर्चमध्ये पुन्हा एकदा लग्न करत एकमेकांना प्रेमाची वचने दिली. या खास सोहळ्यात त्यांची मुलं दिया आणि देव तसेच कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित होते. ज्योतिका पांढऱ्या रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये नववधूप्रमाणे दिसत होती, तर सूर्या फॉर्मल सूटमध्ये दिसला.

‘द सीक्वेल’ म्हणत शेअर केला खास व्हिडिओ; ज्योतिकाची भावनिक पोस्ट चर्चेत

या खास क्षणांचा व्हिडिओ सूर्या आणि ज्योतिका यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘द सीक्वेल’ या कॅप्शनसह शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दोघे चर्चमध्ये एकमेकांना पुन्हा लग्नाची शपथ घेताना दिसत आहेत. २० वर्षांनंतरही आपल्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा कायम असल्याचे या व्हिडिओतून पाहायला मिळते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ज्योतिकाने या खास प्रसंगानिमित्त लिहिलेली भावनिक पोस्टही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. “आमच्यातील प्रेम आणि भांडणाचा २० वर्षांचा प्रवास साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा एकमेकांना लग्नाची वचने दिली,” असे तिने म्हटले. हे परिपूर्ण वैवाहिक जीवनाचे सेलिब्रेशन नसून, नात्यातील अपूर्णता, परिस्थितीनुसार केलेल्या तडजोडी, एकमेकांना समजून घेणे, त्याग आणि निःस्वार्थ प्रेमाचा हा उत्सव असल्याचेही तिने सांगितले.

माधवनपासून जिनिलियापर्यंत सेलिब्रिटींच्या शुभेच्छांचा वर्षाव

ज्योतिकाच्या या भावनिक पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. अभिनेता आर. माधवनने दोघांना शुभेच्छा देताना त्यांना एक खास उदाहरण असल्याचे म्हटले आणि आयुष्यातील अशीच अनेक दशके एकमेकांसोबत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिनेही या पोस्टवर कमेंट करत सूर्या आणि ज्योतिकाला भरभरून प्रेम दिले. “तुमच्या दोघांना खूप खूप प्रेम…” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. सोनाक्षी सिन्हानेही दोघांच्या या खास सेलिब्रेशनचे कौतुक करत पुढील अनेक वर्षांसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सूर्या-ज्योतिकाच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याची आणि या खास क्षणांची चर्चा रंगली आहे.

 हेही वाचा: भाग्यश्रीचे उजळले भाग्य! सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत ‘ऑपरेशन गंगा’ चित्रपटातून मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण