नागपूर :
कचारी सावंगा येथे एका शेतकऱ्याच्या कष्टाने उभा केलेल्या कपाशीच्या पिकाला भीषण आगीने गिळंकृत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी अरविंद जोतीराम पवार यांच्यावर आर्थिक व मानसिक आघात झाला असुन त्यांचा तोंडचा घास अक्षरश: हिरावला गेला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, अरविंद पवार यांनी आपल्या आठ एकर शेतीत कपासीचे पीक घेतले होते. त्यातुन अंदाजे ४० क्विंटल कपाशी वेचून त्यांनी विक्रिसाठी आपल्या जुन्या घरात ठेवला होता. मात्र १४ एप्रिल च्या रात्री अचानक लागलेल्या आगीत हा संपूर्ण साठा जळून राक झाला. घटनेची माहीती मिळताच सरपंच रवी जयस्वाल व पोलीस पाटील रवी दुबे यांनी तात्काळ कोंढाळी पोलीस स्टेशन ला कळवले. त्यानंतर ठानेदार राजकुमार त्रिपाठी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. कोंढाळी नगरपंचायतीच्या अग्निशमक दलानेही तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत सर्व कपाशी जळुन खाक झाला होता. या आगीत अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले असुन पवार कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. विशेष म्हणजे, हा साठवलेला कापूस १३ एप्रिल रोजी विक्रीसाठी नेण्यांचा त्यांचा विचार होता.

मात्र वाहतुकीसाठी वाहन उपलब्थ न झाल्याने कापूस घरातच ठेवावा लागला आणि दुसऱ्याच दिवशी तो आगीत भस्मसात झाला. त्यामुळे हातात आलेला घास नशिबाने हिरावुन घेतला. अशी हळहळ व्यक्त होत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजु शकले नसुन प्रशासना कडुन तपास सुरु आहे. दरम्यान,या घटनेेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी अरविंद पवार पूर्णत: खचून गेले असून त्यांच्या कुटुंबार उपासमारीची वेळ येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गावचे सरपंच व इतर शेतकऱ्यांनी तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटांशी झुंज देत आहे. अशा दुर्घटनांमुळे त्याचे कंबरडे मोडते. शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी भावना व्यक्त होत आहे.
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पवार यांना उभारी देण्यासाठी विशेष आर्थिक साहाय्य, कर्जमाफी किंवा अनुदान देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत या शेतकऱ्याला मदत मिळावी अशी सर्व स्तराकडून आशा आहे.










