Home City post सक्करदरा परिसरात दोन गटांत हाणामारी; कॅफे व कारला आग, १० जणांवर गुन्हे...

सक्करदरा परिसरात दोन गटांत हाणामारी; कॅफे व कारला आग, १० जणांवर गुन्हे दाखल

नागपूर : शहरात काही महिन्यांपूर्वी उसळलेल्या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सक्करदरा परिसरात पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. क्षुल्लक कारणावरून दोन गटांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटांकडून जाळपोळीच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सक्करदरा तलावाजवळील एका कॅफेजवळ रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असलेल्या काही जणांना कॅफेचा मालक शेख याने अर्वाच्च शिवीगाळ केल्याने वादाला तोंड फुटले. यानंतर दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, हाणामारीनंतर अज्ञात व्यक्तींनी संबंधित कॅफेला आग लावली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कॅफे मालकाच्या गटाने जाळपोळ करणाऱ्यांचा पाठलाग करत एका कारला आग लावल्याची घटना घडली. या जाळपोळीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच नंदवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तणाव निर्माण करणाऱ्या दोन्ही गटांतील १० हून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.