Home City post विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; व्हॅनचालकासह एका विद्यार्थिनीचा मृत्यू

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; व्हॅनचालकासह एका विद्यार्थिनीचा मृत्यू

नागपूर : शहरातील मानकापूर उड्डाणपुलावर स्कूल व्हॅन आणि बसमध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजता जोरदार धडक होऊन अपघात झाला. यात एका शाळकरी विद्यार्थिनीसोबत चालकाचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, स्कूल व्हॅनच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर घटनास्थळी आंदोलन करण्यात आले व रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

दोन्ही वाहने एकमेकांवर धडकली

या अपघातात भवन्स बी. पी. विद्यामंदिर, कोराडी येथील विद्यार्थिनी सान्वी देवेंद्र खोब्रागडे (१४, शिवशंभूनगर) व तिच्या स्कूल व्हॅनची चालक श्रुतिका कनोजिया (२४, सदर) यांचा मृत्यू झाला आहे.एमएच ३१-ईएम-००३६ क्रमांकाची स्कूल व्हॅन ही भवन्स बी. पी. विद्यामंदिर, कोराडी येथील विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती; तर एमएच ३१-एफसी-१९१३ क्रमांकाची नारायणा विद्यालयाची बस वर्धा मार्गाच्या दिशेने निघाली होती. त्यात एकही विद्यार्थी नव्हता. उड्डाणपुलावर अनेक दिवसांपासून काम सुरू असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू होती. संबंधित स्कूल व्हॅन वेगाने आली आणि थेट बसवर आदळली.

उपचारदरम्यान दोघींचाही मृत्यू

अपघात इतका भीषण होता की, व्हॅनच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. व्हॅनच्या सर्व काचा फुटल्या व दरवाजादेखील निखळला. त्यातील आठ विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तातडीने मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले. दोन विद्यार्थ्यांना फ्रॅक्चर झाले, तर सान्वी व चालकाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना अतिदक्षता विभागात नेण्यात आले, मात्र उपचारदरम्यान दोघींचाही मृत्यू झाला.या अपघाताची माहिती मानकापूर पोलीस ठाणे व शाळा प्रशासनाला देण्यात आली. या अपघातात विजय मोरे (३८) याला फारशी दुखापत झाली नाही. पोलिसांनी दोन्ही चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.