नागपूर : भंडाऱ्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या फॉर्च्युनर वाहनाला (एमएच ३६ – एपी ९९११) काल पहाटे ६ च्या सुमारास भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ ट्रकची कारला जोरदार धडक बसली. या अपघातात डॉ. पडोळे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेच्या वेळी खासदार स्वतः वाहनात होते. दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाकरीता मतदान करून ते विमानाने मुंबईला पोहोचले. तेथे कार्यालयीन काम पूर्ण केल्यानंतर आपल्या वाहनाने भंडाऱ्याकडे परतत होते. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे पडोळेंचे वाहन असंतुलित झाले आणि ट्रकची कारला जोरदार धडक बसली. सुदैवाने पडोळे यांच्यासह सर्व सहकारी सुखरूप बचावले.
अपघातानंतर प्रश्नचिन्ह
भंडारा-गोंदियाचा बराचसा भाग नक्षलप्रभावित आहे. अशा परिस्थितीत खासदारांना अद्याप शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. सरकारकडे वारंवार मागणी करूनही सुरक्षा न मिळाल्याने या अपघातानंतर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.










