नागपूर : आपण नेहमी ऐकतो या जगात प्रत्येक व्यक्तीचे किमान सात हुबेहूब चेहरे असतात. अनेकदा गंमत म्हणून आपण आपल्या मित्रपरिवारातही बोलतो, “अरे, माझा ड्युप्लिकेट कुठेतरी फिरतोय बहुतेक!” पण हा फक्त विनोद न राहता जर खरोखरच आपल्या डोळ्यांसमोर आपल्यासारखा हुबेहूब चेहरा उभा राहिला, तर? नक्कीच आपण थक्क होऊन जाऊ, नाही का?
असंच काहीसं घडलंय सोशल मीडियावर. काही महिन्यांपूर्वी भाजपा नेते नितेश राणेंचा डुप्लिकेट प्रचंड व्हायरल झाला होता. मंदिरांमध्ये कपाळावर लावल्या जाणाऱ्या गंधाचे ठसे तयार करण्याचं काम करणारा दिनेश पवार हा युवक नितेश राणेंच्या हुबेहूब चेहऱ्यामुळे अचानक चर्चेत आला होता. लोकांनी त्याला अक्षरशः “खरा नितेश” समजलं होतं.
पण आता गंमत आणखीनच रंगतदार झाली आहे. कारण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डुप्लिकेटही समोर आलाय. आणि खरी मज्जा म्हणजे हे दोन्ही डुप्लिकेट नितेश राणेसारखा दिनेश पवार आणि फडणवीसांसारखा हा अनोळखी व्यक्ती हे दोघेही एका ठिकाणी शेजारी शेजारी उभे राहिलेले दिसत आहेत.
हा व्हिडीओ dineshpawar5345 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत तब्बल १६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. जरी व्हिडीओ नेमका कुठे शूट झाला आहे याची खात्री नाही, तरी तो मुंबई परिसरात चित्रीत झाल्याची चर्चा आहे.
व्हिडीओ पाहून नेटकरी अक्षरशः गोंधळले आहेत. कोणीतरी कॉमेंटमध्ये लिहिलंय, “हा तर फडणवीसांचा हरवलेला जुळा भाऊ वाटतोय.” तर दुसऱ्याने मजेत सल्ला दिला, “राजकारणात उतरलं तर भारीच होईल.” काहींनी तर चिमटा काढला की, “खऱ्या फडणवीसांपेक्षा हा डुप्लिकेट जरा जास्तच हसतमुख दिसतोय.”
या सगळ्या गमतीजमतींमध्ये आता मोठा प्रश्न असा उभा राहतो हे डुप्लिकेट जर अचानक तुमच्या समोर आले तर तुम्ही त्यांना ओळखाल तरी का? की चुकून त्यांनाच ‘सर’ म्हणून सलाम ठोकाल?
हा व्हिडीओ जितका विनोदी आहे तितकाच तो सस्पेन्सने भरलेला आहे. कारण लोक खऱ्या आणि डुप्लिकेटमध्येच गोंधळून जात आहेत. सोशल मीडियावर अशा डुप्लिकेट व्यक्तींचे व्हिडीओज जसजसे व्हायरल होत आहेत, तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत चालली आहे. आता पुढचा डुप्लिकेट कोणाचा आणि कसा समोर येतो, हेच पाहणं खरोखरच रोचक ठरेल.









