बिग ब्रेकिंग! अखेर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; ‘या’ तारखेला होणार एकाच टप्प्यात मतदान!

महाराष्ट्र : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज (दि.१५ ऑक्टोबर) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, असे आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajiv Kumar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा होणार असल्याचे समजते.

असा आहे महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम!

महाराष्ट्रातील निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी जारी होईल. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज माघारीसाठी ४ नोव्हेंबर ही अखेरची तारीख असेल. तर २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

राज्यात ९.६३ कोटी मतदार!

महाराष्ट्रात २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार आहेत. यात ४.९७ कोटी पुरुष मतदार आहेत. तर ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. महाराष्ट्रात २० ते २० वयोगटातील तरुण मतदारांची संख्या १.८५ कोटी आहे. तर राज्यात १८ ते १९ वयोगटातील २०.९३ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार असल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली.

प्रचाराला अतिशय कमी कालावधी मिळणार!

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल २६ नोंव्हेबरला संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. २८ नोव्हेंबर पूर्वी राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. यामुळे लोकसभा निवडणुकीसारखाच विधानसभेला अतिशय कमी कालावधी प्रचाराला मिळणार आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीत उमेदवार जाहीर करण्यात कोण आघाडी घेणार? यावर बराच खेळ अवलंबून असणार आहे.

राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:

– महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार असून राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यामध्ये २३४ सर्वसाधारण मतदारसंघ असून २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर २९ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

– मतदार हेल्पलाइनच्या आधारे मतदार आपल्या मतदान केंद्रासह इतर माहिती मिळवू शकतात.

– मतदान केंद्रांवर मतदारसंघांसाठी पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध केल्या जातील.

– निवडणूक काळात पैशांचा गैरवापर होऊ नये, यासाठी विविध ठिकाणी पथकाद्वारे तपासणी केली जाईल.

– ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना आपल्याबाबत तीनदा वृत्तपत्रांतून माहिती द्यावी लागेल.