गोंदिया (तिरोडा) : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. यासंबंधीची फाइल मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. येत्या पाच वर्षांपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला कृषिपंपाचे वीज बिल भरायचे नाही. उपसा सिंचन योजनेलासुद्धा आम्ही आधीच निधी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, तिरोडा येथे धापेवाडा योजनेच्या टप्पा-२ व ३सह इतर विकासकामांचे भूमिपूजन आणि दुरुस्ती झालेल्या वितरिकेचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. यावेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विजय रहागंडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले, माजी आमदार राजेंद्र जैन, हेमंत पटले यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
महायुती सरकारने लाडकी बहीण व राबविलेल्या इतर योजनांमुळे मविआच्या नेत्यांना पोटदुखी होत आहे. ते या योजना बंद करण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु, मविआ ही लबाडखोर असून लबाडांचे आवतन जेवल्याशिवाय खरे होत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. मविआ सरकारने सत्तेवर असताना शेतकऱ्यांच्या योजनांना कात्री लावली, मात्र आम्ही शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक योजना राबवून निधी दिल्याचेही फडणवीस म्हणाले. दुर्दैवी घटनेतही विरोधकांना खुर्चीचा मोह- अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून आरोपींनी हत्या केली. ही दुर्दैवी घटना आहे. यातील दोन आरोपींना अटक केली असून पोलिस या प्रकरणाचा योग्य तपास करीत आहेत. विरोधक माझ्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. यातूनच विरोधकांना किती खुर्चीचा मोह आहे दिसून येते, असे फडणवीस म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
सर्वाधिक निधी आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरीता आणणारे आमदार विनोद अग्रवाल यांचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट आमदारांमध्ये समावेश आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान, आमदार विनोद अग्रवाल यांनी गेल्या पाच वर्षात विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकास कामाची माहिती सांगितली तसेच आपण विशेष मागणी करून डांगोर्ली व पिंडकेपर प्रकल्पाकरिता विशेष निधी आणल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा!
धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामात हेक्टरी २० हजार रुपये बोनस महायुती सरकारने दिले होते. मात्र, आता ते २५ हजार रुपये करून देणार अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात धानाला बोनस घोषित होत होत असले तरी, ते शेतकऱ्यांना मिळत नव्हते, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. आमचे सरकार आले तेंव्हा पासुन आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना आधी १५ हजार बोनस दिला, नंतर २० हजार रुपये व यावर्षी २५ हजार रुपये बोनस ची मागणी आहे. ती मागणी मी वकील बनवून मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि मागणी पूर्ण करून देईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.