Home एंटरटेनमेंट पोस्ट स्वत:च्या रिव्हॉल्वरची गोळी लागून अभिनेता गोविंदा जखमी; नेमकं काय घडलं?

स्वत:च्या रिव्हॉल्वरची गोळी लागून अभिनेता गोविंदा जखमी; नेमकं काय घडलं?

Actor Govinda Bullet Injury: बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्या पायाला गोळी लागली आहे. गोळी लागल्यामुळे अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर आहे. गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याचा दावा त्याच्या मॅनेजरने केला आहे. अभिनेत्याला गोळी लागल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली.

दरम्यान, गोविंदाला गोळी कशी लागली? खरंच त्याने स्वतःच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली होती का? गोळी लागली तेव्हा तो काय करत होता? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रकारानंतर अभिनेता गोविंदा याने प्रतिक्रिया देताना आपल्या सर्व चाहत्यांचे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत.

कशी लागली गोळी?

गोविंदा सकाळी ४.४५ मिनिटांनी जुहू येथील राहत्या घरातून निघण्याची तयारी करत होता. अभिनेता कोलकाता जाण्यासाठी विमानातून प्रवास करणार होता. तेव्हाच अचानक अभिनेत्याच्या पायाला अचानक गोळी लागली. पण अद्याप गोविंदाने घडलेल्या घटनेप्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही. अभिनेत्याच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, ‘रिव्हॉल्वर कपाटात ठेवत असताना गोविंदाच्या हातातून रिव्हॉल्वर खाली पडली आणि गोळी अभिनेत्याच्या पायाला लागली. रिव्हॉल्वरचे लॉक सुरु असल्यामुळे गोळी लागली असे समजते.

गोविंदाची प्रकरणानंतर पहिली प्रतिक्रिया काय?

तुमच्या सगळ्यांचे, आई वडिलांचे आशीर्वादामुळे मी वाचलो आहे. मला गोळी लागली होती पण ती आता काढली आहे. मी डॉक्टरांचे आभार मानतो. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली त्यासाठीही धन्यवाद, असे गोविंदा ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना दिसत आहे.

पोलिसांनी रिव्हॉल्वर घेतली ताब्यात!

घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तात्काळ घटना स्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनेची चौकशी केली आणि रिव्हॉल्वर ताब्यात घेतली. सध्या याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. यावर अभिनेत्याच्या कुटुंबियांकडून अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.