पंढरपूर : प्रेमाला काही वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. मात्र पंढरपुरात उतरत्या वयात फुललेल्या एका प्रेमाचा शेवट रक्तरंजित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ७० वर्षीय अंबादास खांडेकर यांच्या हत्या प्रकरणात ६५ वर्षीय मंगला होमवणे हिला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे पंढरपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
अनेक वर्षांपासून होते प्रेमसंबंध
मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास खांडेकर आणि ६५ वर्षीय मंगला होमवणे यांचे गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू होते. मात्र २७ जुलैच्या सुमारास या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मंगलाने अंबादास यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मृतदेह अर्धवट जाळून शेतात पुरला
हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मंगलाने अंबादास यांचा मृतदेह अर्धवट जाळला आणि त्यानंतर तो शेतात पुरल्याची माहिती आहे. हत्या झाल्यानंतर हे प्रकरण गुपितच राहिलं. तब्बल दीड महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
शेतात आढळला पुरलेल्या अवस्थेतील मृतदेह
२ ऑगस्ट रोजी गावातील नागरिकांना शेतात पुरलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी याबाबत गावात संपर्क केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
मृतदेहाची ओळख पटवणे होते आव्हान
तपासादरम्यान गावातील ७० वर्षीय अंबादास खांडेकर हे गायब असल्याचं समोर आलं. मात्र मृतदेह अर्धवट जळालेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच आहे, हे ठामपणे सांगता येत नव्हतं. त्यामुळे पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान होतं.
DNA चाचणीमुळे तपासाला मिळाली दिशा
या प्रकरणात सर्वात मोठं वळण आलं ते DNA चाचणीमुळे. पोलिसांना तपासाची दिशा मिळाली होती. मात्र DNA रिपोर्ट कुणाशी मॅच करायचा, हा प्रश्न पोलिसांसमोर होता. अखेर दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अंबादास यांच्या मुलींची DNA चाचणी करण्यात आली.DNA रिपोर्ट आल्यानंतर शेतात आढळलेला मृतदेह हा अंबादास खांडेकर यांचाच असल्याची खात्री पटली. यानंतर पोलिसांनी कोणताही वेळ न दवडता या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली.
संशयाची सुई मंगला होमवणेकडे
तपासादरम्यान संशयाची सुई थेट अंबादास खांडेकर यांच्या प्रेयसी म्हणजेच ६५ वर्षीय मंगला होमवणे हिच्यावर येऊन थांबली. पोलिसांनी कसलाही वेळ न गमावता मंगलाला अटक केली.पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान मंगलाने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून एका किरकोळ वादातून हे प्रकरण घडलं आणि त्यातूनच हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेमागचं नेमकं कारण आणि तपासातून आणखी काय काय समोर येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.